दहशतवाद मिटवण्यासाठी काश्मीरी तरुणांचे एक पाऊल पुढे

श्रीनगर : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर हजारो तरुण लष्करात जाण्यासाठी उत्सुक आहेत. बारामुल्ला येथे भारतीय लष्कराने १११ जागांसाठी भरती सुरू केली असून काश्मिरी तरुणांनी याला चांगला प्रतिसाद दिला. लष्करात भरती होण्यासाठी १११ जागांसाठी तब्ब्ल २५०० तरुणांनी अर्ज केले आहेत.

काश्मीरी तरुणांचे लष्कर भरतीविषयी मत
लष्करात भरती होण्यासाठी अर्ज करणाऱ्या बिलाल अहमद या तरुणाने सांगितलं की, ‘लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. आम्हाला नोकरीची फार कमी संधी आहे. लष्करात भरती होऊन आम्ही आमच्या कुटुंबाची सुरक्षा करु शकतो सोबत काळजी देखील घेऊ शकतो’. तर ‘आम्ही काश्मीरच्या बाहेर जाऊ शकत नाही. आमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. काश्मीरमधील जवानांना संवेदनशील परिसरांमध्ये तैनात केलं तर ते स्थानिकांशी चर्चा करत जास्त चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळू शकतात’ असं ही एका तरुणाने सांगितलं आहे.

काश्मिरात घुसखोरी करणारे जिवंत राहणार नाहीत
पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ला हा आदिल दार या दहशतवाद्याने केला होता. आदिल हा पुलवामा येथील रहिवासी असून तो मार्च २०१८ मध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. या पार्श्वभूमीवर तुम्ही हातात शस्त्र घ्याल, तर तुमचा खात्मा करणारच, अशा शब्दात भारतीय सैन्याने दहशतवादी मार्गाकडे वळणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील तरुणांना ठणकावले आहे. अनेक गाझी आले आणि गेले, दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान आम्ही ठरवलं आहे. जो काश्मीरमध्ये घुसखोरी करणार, त्याला कंठस्नान घालणारच, असेही सैन्याने म्हटले आहे. तसेच विविध ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असेही सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.