जावेद अख्‍तर-शबाना आझमींनी रद्‍द केला पाकिस्‍तान दौरा

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या वाहनावर भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देशभरातुन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हा हल्ला झाल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. अभिनेत्री शबाना आझमी आणि जावेद अख्तर हे एका कार्यक्रमासाठी पाकिस्तानला जाणार होते मात्र त्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत त्यांचा नियोजित पाकिस्ताचा दौरा रद्द केला आहे. याबाबतचे ट्विट स्वतः जावेद अख्‍तर यांनी केले आहे.

पाकिस्तानच्‍या कराची आर्ट काऊन्‍सिलमध्‍ये सहभागी होण्‍यास शबाना आझमी आणि जावेद अख्‍तर यांनी नकार दिला आहे. दोघांना कवी कैफी आझमीच्‍या कार्यक्रमात सहभागी होण्‍याचे निमंत्रण मिळाले होते. कैफी आझमी हे शबाना आझमीचे वडील आणि जावेद अख्तरचे सासरे आहेत. पण त्यांनी पाकिस्तान दौरा रद्द केला आहे.

कराची साहित्य संमेलनासाठी होते निमंत्रण

जावेद यांनी ट्‍विटमध्‍ये लिहिले आहे-कराची आर्ट काऊन्‍सिलने शबाना आणि मला दोन दिवस आधी कैफी आझमी आणि त्‍यांच्‍या कवितांविषयी होणार्‍या लिटरेटर कॉन्फरन्‍समध्‍ये आमंत्रित केले होते. आम्‍ही हे रद्‍द केले आहे. १९६५ मध्‍ये इंडो-पाक युद्धादरम्‍यान, कैफी साहब यांनी एक कविता लिहिली होती, ”और फिर कृष्णा ने अर्जुन से कहा”.

जावेद अख्तर यांनी आणखी एक ट्‍विट करत लिहिले आहे- ”माझे CRPF शी विशेष संबंध आहे. मी त्‍यांच्‍यासोबत ॲन्‍थम सॉन्ग लिहिले आहे. पेन कागदावर ठेवण्‍यापूर्वी मी अनेक सीआरपीएफ अधिकार्‍यांना भेटलो होतो. धाडसी जवानांच्‍या कुटुंबीयांप्रती संवेदना.”

शबाना आझमी यांनीही या हल्‍ल्‍याचा निषेध केला आहे. त्यांनी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.