‘देशाला हिंदू पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न सुरू’ : गीतकार जावेद अख्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाला हिंदू पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणत गीतकार जावेद अख्तर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. स्पष्टवक्तेपणासाठी फेमस असणाऱ्या जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वीच नागरिकत्व कायद्यावरून सरकारवर टीका केली होती. यानंतर पुन्हा एकदा त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रसिद्ध रंगकर्मी सफदर हाश्मी यांच्या 31 व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

जावेद अख्तर म्हणाले, “देशातील नागरिकांना धर्माच्या आधारावर विभागलं जात आहे. गर्वानं सांगा आम्ही हिंदू, अशा घोषणा देण्यास भाग पाडलं जात आहे. यामुळे समस्या सुटणार नाहीत. शरणार्थींना धर्म नसतो. त्यामुळे देशात असा कायदा असावा ज्यामध्ये धार्मिक भेद होणार नाही.”

पुढे बोलताना अख्तर म्हणाले, तुम्ही एका भारतीय व्यक्तीला त्याचं राष्ट्रीयत्व कसंकाय मागू शकता. आदिवासी, दलित आणि गरिबांकडे पुरावा मिळाला नाही तर त्यांना सरकार कुठं पाठवणार. या लोकांनी सरकारला मतदान केलं आहे. त्यावेळी त्यांनी नागरिकत्व विचारलं नाही. देशातील 10-12 कोटी निर्वासितांची सरकारनं व्यवस्था केली का ?” असा सवालही त्यांनी केला.

नागरिकता कायद्याला विरोध केलेल्या आंदोलनानंतर ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अटक करण्यात आली होती. यावेळीही जावेद अख्तर यांनी या अटकेचा विरोध केला होता. यावेळी अख्तर यांनी आरोप केला होता की, सरकार विरोध दडपण्याचं काम करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/