शिवसेनेचं ‘कन्सलटंसी’ लाऊन राजकारण, आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोरांच ‘प्रॉडक्ट’ : जयंत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेच्या पार्श्वभूमिवर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोरांचं प्रॉडक्ट असून शिवसेनेवर कन्सलटंसी लाऊन राजकारण करायची वेळ आली आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

शिवसेनेचा मोर्चा हा फेससेव्हिंग आहे. आम्ही आंदोलन करणार आहोत. सरकारच्या विरोधात वातावरण पेटवणार आहोत. आम्ही काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याकडे आयटी यंत्रणा नाही. तेवढी आमची ताकद नाही. तेवढे पैसे आमच्याकडे नाही, असं जयंत पाटील यांनी सांगिंतल.

तसंच त्यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली. आमचे आमदार मुख्यमंत्र्यांना कामासाठी भेटायला जातात. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजप विसरले आहे. विरोधक मजबूत नसतील तर मग त्यांचे आमदार का पळवले जात आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शिवसेना-भाजप युतीत मुख्यमंत्रिपदावरून कलगी तुरा सुरू आहे. शिवसेनेला भाजपच नेतृत्त्व मान्य नाही, हे सांगत भाजप-सेनेचे नेते आमच्याही संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी चर्चा झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच महाराष्ट्रात २८८ जागांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होते, तर त्यासाठी साधारण ७८० अर्ज आले आहेत. काँग्रेससोबत चर्चा करून अंतिम टप्प्यात उमेदवारांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, जागवाटपाची चर्चा बुधवार पर्यंत पूर्ण होईल. प्रकाश आंबेडकरांना पत्र पाठवण्यात आले आहे. आता काय होते ते पहावे लागेल. तसंच राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याबाबत काँग्रेसची नेमकी भूमिका काय माहीत नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरोग्यविषय वृत्त –