JEE Advanced Result : IIT मुंबई झोनचा चिराग फेलोर अव्वल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  सोमवारी सकाळी आयआयटी दिल्लीकडून जेईई(JEE)  ॲडव्हान्स्डचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई झोनमधून चिराग फेलोर याने प्रथम क्रमांक पटकवला आहे. चिरागला ३९६ पैकी ३५२ गुण मिळाले आहेत. आयआयटी मद्रासचा गांगूला भुवन रेड्डी तर आयआयटी दिल्लीचा वैभव राज यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले आहे. जेईई ॲडव्हान्स्डमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी आता देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.

आयआयटी मुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून पहिली आली आहे तर संपूर्ण देशात तिला ६२वे स्थान मिळाले आहे. आयआयटी मुंबई झोनमधून पहिल्या पाच स्थानावर चिराग फेलोर(१), आर महेंदर राज (४), वेदांग आसगावकर (७), स्वयं चुबे ( ८) आणि हर्ष शाह ( ११) यांना स्थान मिळवण्यात यश आलं आहे. जेईई मधील टॉप १०० विद्यार्थ्यांमध्ये आयआयटी मुंबई झोनमधून २४ , टॉप २०० मध्ये ४१, टॉप ३०० मध्ये ६३ , टॉप ४०० मध्ये ८२ तर टॉप ५०० मध्ये १०४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

२७ सप्टेंबर २०२० रोजी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आली होती. भारतासह परदेशातही काही केंद्रे होती. ज्या विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी फक्त ९६ टक्के लोकांनी हि परीक्षा दिली आहे. पेपर १ मध्ये १,५१,३११ विद्यार्थी तर पेपर २ मध्ये १,५०,९०० विद्यार्थी सहभागी झाले होते.