जेजुरीतील ‘कोरोना’मुक्त कुटुंबाकडून डॉक्टर, नर्स व देवसंस्थांच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

जेजुरी – जेजुरी येथे देवसंस्थांन च्या वतीने सर्वसुविधायुक्त मार्तंड कोव्हिड सेंटर उभारले आहे. शहरातील बेलसरे कुटुंबातील पाच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींनी या सेंटर मध्ये उपचार घेतले . या सेंटरला योग्य व चांगल्या सुविधा मिळाल्याने हे कुटुंब भारावून गेले . कोरोनामुक्त होताना या कुटूंबियाच्या वतीने येथील डॉक्टर, नर्स व देवसंस्थांनचे कर्मचारी यांचा सन्मान करून त्यांना मिठाई भेट देण्यात आली.

पुरंदर तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना श्री मार्तंड देवसंस्थांनच्या वतीने या रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जेजुरी कडेपठारच्या पायथ्याशी जिजामाता इंग्लिश स्कुल मध्ये दि 28 सप्टेंबर रोजी 100 बेडचे मार्तंड कोव्हिड सेंटर सुरू केले. येथे रुग्णांना बेड,वाफेचे मशीन ,गार व गरम पाणी चहा- नाश्ता, जेवण, योगा आदींची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

जेजुरी शहरातील बेलसरे कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने हे सर्व जण येथील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल झाले. या सेंटर मध्ये वैद्यकीय उपचार, तसेच सर्व सुविधा आपुलकीने दिल्या गेल्या सर्व रुग्णांची काळजी घेतली गेली .आज या पाच व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले . या सेंटरचे ऋण व्यक्त करण्यासाठी बेलसरे परिवाराच्या वतीने जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते येथील डॉक्टर नर्स व देवसंस्थांनच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करून दिवळीपूर्वीच मिठाई वाटण्यात आली .

यावेळी पोलीस निरीक्षक सुनील महाडीक श्री मार्तंड देवसंस्थांनचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त पंकज निकुडे, व्यवस्थापक सतीश घाडगे, माजी विश्वस्त नितीन राऊत सुवर्णस्टारचे रज्जक तांबोळी आदी उपस्थित होते . अमोल बेलसरे, सतीश घाडगे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले .