‘हे प्रथमच घडलं, सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला’; जितेंद्र आव्हाडांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. राज्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी कशी चर्चा झाली याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

ठाकरे सरकारने महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत मंत्री आग्रही होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आजच निर्णय घ्यावा यासाठी सर्व मंत्र्यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

पहिल्यांदाच असे घडले…

जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीसंदर्भात माहिती देताना सांगितले की, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला, हे पहिल्यांदाच पहायला मिळाले. लॉकडाऊनबाबत आजच निर्णय घ्यावा असा दबाव टाकला. गेल्या वेळी लॉकडाऊन उघडा, असं काही मंत्री म्हणत होते. पण आता सगळ आऊट ऑफ कंट्रोल जात आहे. पेटणाऱ्या चिता शांत झोप लागू देत नाहीत. म्हणजे लागणारच नाही. ज्याला हृदय आहे त्याला या चिता बघून झोप लागणे अश्यक्य आहे. त्यामुळे लॉकडाऊन करावे, असे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. आता यासंदर्भात काय नियम करायचे याबाबतचे मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत. लोक घराच्या बाहेर पडले नाही पाहिजेत. यासाठी जे करता येईल ते करावे लागणार आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहिर करतील

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्यात लॉकडाऊन लागणार आहे. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. कडक लॉकडाऊन करावा ही जनतेची भावना आहे. सध्या रुग्णांना उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन मिळत नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणावा लागतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.