शरजील इमामच्या विरूध्द दिल्ली पोलिसांनी दाखल केलं ‘चार्जशीट’, देशद्रोहाचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या निषेधाच्यावेळी शरजील इमाम याला अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी त्याला 28 जानेवारी रोजी बिहारच्या जहानाबाद येथून अटक करण्यात आली. शरजील इमाम याच्याविरोधात दिल्लीच्या साकेत कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शरजील इमामवर देशविरोधी भाषण करून हिंसाचाराला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

हिंसा भडकवल्याचा आरोप

शरजील इमाम याने देशविरोधी केलेले भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्याने हे भाषण 13 डिसेंबर रोजी केले होते. देशविरोधी भाषण करून हिंसा भडकवल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी इमामवर एफआयआर दाखल केला होता. शरजील इमाम याचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला बिहारच्या जहानाबाद येथून अटक केली. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्याच्यावर आयपीसीच्या कलम 124 ए (देशद्रोह) आणि 153 ए (धर्म, भाषा, वंश इदत्यादींच्या आधारे द्वेष पसरवणे) गुन्हा दाखल केला.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 15 डिसेंबर रोजी जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांनी नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात न्यू फ्रेंड्स कॉलनी आणि जामिया येथे मोर्चा काढला. त्या दरम्यान हिंसाचार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या काळात जाळपोळ व हिंसाचार होऊन दगडफेक करण्यात आली. यामुळे सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वादग्रस्त भाषणामुळे चर्चेत

दिल्ली पोलिसांनी दंगल, हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यासंबंधीचे गुन्हे दाखल केले. एफआयआरच्या आधारावर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, शरजील इमाम याने वादग्रस्त भाषण केल्यानंतर जामियामध्ये हिंसाचार भडकला. याप्रकरणी शरजील इमाम याला अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे शरजील इमाम चर्चेत आला.