50 हजाराची लाच स्विकारताना महापालिकेचा कनिष्ठ अभियंता व खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – घराच्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या अभियांत्याने 1 लाख 40 हजार रुपयाची लाच मागितली. लाचेचा पहिला हप्ता स्विकारल्यानंतर उर्वरीत रकमेपैकी 50 हजार रुपये खासगी व्यक्तीकडून स्विकारणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर कनिष्ठ अभियंता फरार झाला आहे. ही कारवाई मंगळवार (दि.25) लगून महाकाली रोडवरील एका चहाच्या दुकानासमोर करण्यात आली.

संतोष पवार असे फरार झालेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. तर अब्दुल आहद खान (वय-43 रा. मार्वे क्रॉस रोड, मालवणी, मलाड (प) मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या खासगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारदार यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रविवारी (दि.23) तक्रार दाखल केली. पथकाने मंगळवारी (दि.25) सापळा रचून ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे मालवणी येथे घराचे बांधकाम सुरु आहे. बृहन्मुंबई महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या संतोष पवार याने बांधकामाच्या ठिकाणी येऊन फोटो काढले. हे बांधकाम अवैधरित्या सुरु असल्याचे सांगून भेटण्यास सांगितले. तक्रारदार यांनी संतोष पवार यांची भेट घेतली असता. बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 1 लाख 40 हजार रुपायांची लाच मागितली. तक्रारदार यांनी मे महिन्यात 30 हजार रुपयाचा पहिला हप्ता दिला होता.

त्यानंतर संतोष पवार याने तक्रारदार यांच्याकडे उर्वरीत पैशांसाठी तगादा लावला. तक्रारदार यांनी रविवारी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने सोमवारी (दि.24) पंचासमक्ष पडताळी केली. त्यावेळी संतोष पवार याने तक्रारदार यांना लाचेची रक्कम खासगी इसम अब्दुल आहद खान याच्याकडे देण्यास सांगितले. यानुसार मंगळवारी (दि.25) लगून महाकाली रोड वरील एका चहाच्या दुकानासमोर खान याला तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याचे समजताच संतोष पवार हा फरार झाला आहे. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.