लोकसभेचं समरांगण : काकडेंनी अपक्ष निवडणूक लढवावी ; कार्यकर्त्यांचा आग्रह

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-(मार्कंडेयानुज धनवाडे)  “भाजपची उमेदवारी मिळणार नाही, काँग्रेसनं तर उमेदवारीचा प्रश्नच निर्माण होत नाही असं स्पष्ट करून उमेदवारी नाकारली. तसं पाहिलं तर संजय काकडे हे ना भाजपचे सदस्य आहेत ना काँग्रेसचे! त्यामुळं त्यांनी आपल्याला कोणताच पक्ष धार्जिणा नाही, तेव्हा आपण अपक्ष आहोत तसंच अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असा विचार सुरू असल्याचं जाणवतं. भाजपमध्ये त्यांचे समर्थक कार्यरत आहेतच. शिवाय शिवसेनेचा उमेदवार इथं नसल्यानं शिवसैनिकांची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांची मदत होऊ शकते. राष्ट्रवादीनं जर अप्रत्यक्षरीत्या मदत केली तर आपण ही जागा काढू शकतो असा संजयरावांच्या कार्यकर्त्यांचा होरा आहे. भाजपकडून कुणीही आलं तरी बहुजन समाजाच्या मराठा समाजाच्या उमेदवाराला लोक मतदान करतील असा या समर्थकांना विश्वास वाटतो आहे. त्यामुळं संजयराव पुण्याची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार की काय? अशी चर्चा आहे.”

आपलेच भविष्य काकडेंना कळेना…!
पुण्याच्या राजकारणात थेट खासदार म्हणून उतरलेल्या संजय काकडेंनी आजवर अनेक राजकीय भविष्य वर्तवली आहेत. संसदीय राजकारणात भाजपेयींच्या साथीला गेलेले संजयराव आताशी भांबावले आहेत. शहरातील पारंपरिक भाजपेयींचं हात बळकट करण्यासाठी त्यांनी आपल्याकडील सारी आयुधं वापरून अनेकांना जोडलं. भाजपेयींना आलेली ही सुदृढता बाळसं नव्हे तर सूज आहे. हे कळायला त्यांना काहीसा वेळ लागला. त्यामुळंच त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादीसोबत पूर्वीचे कापलेले दोर पुन्हा जुळविण्याचा प्रयत्न केलाय. आज त्यांची अवस्था ‘मैं इधर जाऊं या उधर जाऊं…!’ अशी झालीय. त्यांचं राजकीय भवितव्य, भविष्य त्यांचं त्यांनाच कळेना अशी स्थिती झालीय!

राज्यसभेच्यावेळी पवारांचा शब्द प्रमाण मानला
संजयराव यांनी थेट खासदार होण्याचाच घाट पहिल्यांदा घातला आणि अपक्ष आमदारांना साथीला घेतलं, तेव्हा शरद पवारांनी त्यांना बोलावून थांबण्याचा सल्ला दिला. त्यांच्या उमेदवारीनं राष्ट्रवादीला धक्का बसला असता. पवारांचा सल्ला शिरोधार्य मानून त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. पवारांचा त्यांचा पूर्वीपासून संबंध होता. बांधकाम व्यावसायिक असल्यानं पवारांनी पुणे-पिंपरी चिंचवड भागातील सरकारी, निमसरकारी कामं संजयरावांना मिळवून दिली होती. त्यामुळं त्यांच्यावर पवारांच्या उपकाराचं नाही म्हंटलं तरी ओझं असणारच! त्याला जागून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर जेव्हा पुन्हा राज्यसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा पुन्हा ते रिंगणात उतरले. यावेळी त्यांनी खबरदारी घेतली. शरद पवार यांची भेट घेऊन दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. त्याचबरोबर भाजप, शिवसेना, काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांची भेट घेतली. आता आपण रिंगणात आहोत तेव्हा मदत करा असं त्यांनी त्यांना विनवलं. सर्व पक्षाच्या नेत्यांशी संजयरावांचे सौहार्दाचे संबंध आहेत. त्या साऱ्या पक्षनेत्यांचे वाढदिवस त्यांना लक्षांत असतात आणि आवर्जून त्यांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा देतात. अशा संबंधामुळे संजय काकडे यांची राज्यसभेवर निवड झाली. राज्यसभेत भाजपेयींचं बहुमत नव्हतं. त्यांची धोरणं राबविण्यासाठी तिथं बहुमत हवं होतं. त्यासाठी त्यांनी प्रत्येकाची मनधरणी केली. त्यात त्यांना यश आलं नाही तरी संजयराव त्यांच्या गळाला लागले आणि ते भाजपचे सहयोगी सदस्य बनले.

महापालिका निवडणुकीतली भविष्यवाणी
भाजपशी साठगाठ बांधल्यानंतर संजयरावांच्या अंगात उत्साह संचारला. त्यांनी आपण भाजप खासदार आहोत अशा अविर्भावात त्यांनी मग चौफेर फटकेबाजी करायला सुरुवात केली ‘साम, दाम, दंड, भेद’ ही आयुधं कशी आणि केव्हा वापरायची याचं ज्ञान आणि क्षमता त्यांच्याकडं भरपूर असल्यानं त्यांनी आपल्या या कौशल्याचा वापर करीत अनेकांना भाजपशी जोडलं. मुख्यमंत्री फडणवीस हे पक्षाचे जबाबदार असल्यानं पक्षवाढीसाठी संजयरावांनी जे प्रयत्न चालविले होते त्याला खतपाणी घातलं. पुण्यात भाजपतील गटबाजीत मुख्यमंत्र्यांचा गट म्हणून संजयरावांनी एन्ट्री घेतली. साहजिकच पक्षातले पारंपरिक वतनदार, सरंजामी हे सारे बिथरले. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपली मोहीम सुरूच ठेवली. पक्षांत त्यांनी आणलेले खंदे समर्थक होतेच, शिवाय या गटबाजीचे बळी ठरलेले अनेकजण संजयरावांच्या तंबूत डेरेदाखल झाले. मग संजयरावांनी आपलं स्थान बळकट करण्यासाठी महापालिका आणि शहर राजकारणात उडी घेतली. महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यानं आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवून दिली. आता आपल्याला महापालिकेचे आणि शहराच्या राजकारणाचं नेतृत्व करायचं आहे, या उद्देशाने सगळ्या भाजप उमेदवारांना त्यांनी सर्वप्रकारची मदत केली. त्यांनी असा पुढाकार घेतल्यानं त्यांचा पक्षातला संपर्क वाढला. या संपर्कामुळेच त्यांनी महापालिकेत भाजपची सत्ता येईल आणि शंभर नगरसेवक निवडून येतील अशी भविष्यवाणी केली. जी पुढं जाऊन खरी ठरली.

गुजरातसह इतर राज्यातही भविष्यवाणी
महापालिकेनंतर गुजरात विधानसभेच्या निवडणुका आल्या. त्यावेळीही त्यांनी भविष्यवाणी केली. गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार नाही आली तर तर ती अत्यंत अल्पमताने येईल असं वर्तवलं. ही भविष्यवाणी देखील महापालिकेप्रमाणे खरी ठरली. नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड इथं असलेली भाजपेयींची सत्ता जाईल. अशी भविष्यवाणी केली. अर्थात तीही खरी ठरली. या त्यांच्या भविष्यवाणीनं आणि संजयरावांच्या वाढत्या संपर्कानं पक्षातले ‘ढूढ्ढाचार्य’ अस्वस्थ झाले. त्यांच्या खुर्च्या गदागदा हलायला लागल्या. त्यांच्या स्थानाला धक्का लागतोय असं दिसताच त्यांनी संजयरावांची कोंडी करायला सुरुवात केली. त्यांनी केलेल्या भविष्यवाणीत यांची यंत्रणा होती, सफॉलोजीचा अभ्यास होता. हे भाजपेयींनी गांभीर्यानं न घेता ‘मटक्याचे आकडे’ संबोधिले गेले.

वाढदिवसाच्या निमित्तानं मोर्चे बांधणी
संजयरावांनी मध्यंतरी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या समर्थकांकरवी शहरात शुभेच्छा फलक लावले. पाठोपाठ त्यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविणार असं घोषित केलं. साहजिकच पक्षांत असलेले विद्यमान खासदार, नामदार, इच्छुकांची अस्वस्थता वाढली. त्यांनी संजयरावांच्या विरोधात मोहीम उघडली. थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या. तेव्हा त्यांना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला गेला. पण संजयराव आपल्या मतांवर कायम राहिले. दरम्यान दिल्लीत त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या त्यांच्या चालीनं भाजपमध्ये जशी खळबळ उडाली तशीच ती काँग्रेसमध्येही उडाली. सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांत मात्र आनंद व्यक्त झाला. सुरेश कलमाडीनंतर त्यांना त्यांच्यासारखाच ‘व्यावसायिक’ राजकारणी लाभला म्हणून संजयरावांच्या कार्यालयावर काँग्रेसी मंडळीही दाखल झाली. काँग्रेसपक्षातले लोकसभेसाठीचे इच्छुक प्रकारानं अस्वस्थ झाले. त्यांनी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण ‘संजय काकडे हे पक्षाचे साधे सदस्यही नाहीत, तेव्हा त्यांना उमेदवारी देण्याचा प्रश्नच येत नाही…!’ असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधीनंतर अजित पवारांची भेट
पण राजकारणात केव्हाही अन काहीही होऊ शकतं! शहरातल्या जागेसाठी केवळ काँग्रेसच नाही तर राष्ट्रवादीशी आघाडी असल्यानं त्यांचाही विचार, सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण महागठबंधनात शक्तिशाली राहायचं असेल तर शरद पवारांना प्रत्येक जागा महत्वाची आहे. तेव्हा शहरातला उमेदवार देताना शरद पवारांचा शब्दाला वजन राहणार आहे. यासाठीच संजयरावांनी आपलं अजित पवारांशी असलेलं वैमनस्य, नाराजी बाजूला सारून थेट भेट घेतली. ‘शहरातली सीट निवडून आणायची असेल तर मला उमेदवारी द्या, मी नक्कीच ती जिंकून आणीन…!’ असं म्हटल्याचं त्यांचे समर्थक सांगतात. भाजपची उमेदवारी मिळणार नाही, काँग्रेसनं तर उमेदवारीचा प्रश्नच निर्माण होत नाही असं स्पष्ट करून उमेदवारी नाकारली. तसं पाहिलं तर संजय काकडे हे ना भाजपचे सदस्य आहेत ना काँग्रेसचे! त्यामुळं त्यांनी आपल्याला कोणताच पक्ष धार्जिणा नाही, तेव्हा आपण अपक्ष आहोत तसंच अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असा विचार सुरू असल्याचं जाणवतं. भाजपमध्ये त्यांचे समर्थक कार्यरत आहेतच. शिवाय शिवसेनेचा उमेदवार इथं नसल्यानं शिवसैनिकांची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांची मदत होऊ शकते. राष्ट्रवादीनं जर अप्रत्यक्षरीत्या मदत केली तर आपण ही जागा काढू शकतो असा संजयरावांच्या कार्यकर्त्यांचा होरा आहे. भाजपकडून कुणीही आलं तरी बहुजन समाजाच्या मराठा समाजाच्या उमेदवाराला लोक मतदान करतील असा या समर्थकांना विश्वास वाटतो आहे. त्यामुळं संजयराव पुण्याची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार की काय? अशी चर्चा आहे.

You might also like