संतापजनक ! कंगना ‘द्रौपदी’ तर उध्दव ठाकरे ‘दुःशासन’, वाराणसीत लागलेल्या पोस्टर्सवरून पेटलं ‘महाभारत’

वाराणसी : वृत्तसंस्था – बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. या दोघांच्या वादाने आता राजकीय वळण घेतले असून मुंबई महापालिकेने कंगनाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. यामुळे संतापलेल्या कंगनाने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. मुंबईत सुरु असलेल्या वादाचे पडसाद आता उत्तर भारतात देखील उमटण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये लागलेल्या एका पोस्टर्समुळे राजकीय महाभारत पेटले आहे.

वाराणसीच्या चौकाचौकामध्ये लागलेल्या पोस्टर्समधून कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या वादाची तुलना महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाशी करण्यात आली आहे. यामध्ये कंगना द्रौपदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दु:शासनाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीकृष्णाच्या रुपात दिसत आहे. हे सर्व पोस्टर्स वाराणसीमधील वकील श्रीपती मिश्रा यांनी लावले आहेत.

श्रीपती मिश्रा यांनी याबाबत सांगितले की, महाराष्ट्र सरकारने कंगनाचे कार्यालय पाडण्याची केलेली कारवाई हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. दरम्यान, या संपूर्ण वादामध्ये कंगनाविरोधात आक्रमक राहिलेल्या शिवसेनेला कौरवसेनेच्या रुपात दाखवण्यात आले असून, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची तुलना धृतराष्ट्राशी करण्यात आली आहे.

कंगनाची आगपाखड, तर शिवसेनेचे मौन
कंगना राणौत हिने गुरुवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिका आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आगडपाख केली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारधारेवर शिवसेना उभारली तीच विचारधारा सत्तेसाठी विकून शिवसेनेची सोनिया सेना बनली आहे, अशा शब्दात तिने फटकारले आहे. मात्र, तिच्या या वक्तव्यावर शिवसेनेने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.