डॉक्टरनं ‘पगार’ मागितला तर हॉस्पीटलनं नोकरीवरून काढलं, आता पत्नीसोबत स्टॉलवर विकतायेत ‘चहा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लॉकडाऊन दरम्यान सीएम सिटी करनालमध्ये एक आगळेवेगळे दृश्य पहायला मिळाले. शहरातील रस्त्याच्या कडेला एक डॉक्टर आपल्या नवविवाहित पत्नीसह एका गाड्यावर चहा विकत आहेत. जो कोणी हे दृश्य पाहतो तो तिथेच थांबतो. हे डॉ. गौरव शर्मा आहेत. ते एका खासगी रुग्णालयात डॉक्टर होते. जेव्हा त्यांनी त्यांच्या दोन महिन्यांच्या पगाराची मागणी केली तेव्हा त्यांची प्रथम बदली करण्यात आली आणि विरोध केल्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

डॉ. गौरव शर्मा एका खासगी कंपनीतर्फे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयात नोकरी करत होते. असा आरोप केला जात आहे की त्यांना दोन महिन्यांपासून पगार देण्यात आला नव्हता आणि पगाराची मागणी केल्यास त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यामुळे अस्वस्थ होऊन डॉ. गौरव शर्मा यांनी नवविवाहित पत्नीसमवेत चहाची गाडी लावली. हॉस्पिटलचा ड्रेस परिधान करून सेक्टर -13 मध्ये त्यांनी चहा विकण्यास सुरुवात केली. इथल्या लोकांना त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे सरकारकडे संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. गौरव शर्मा सेक्टर -13 मध्ये असलेल्या खासगी कंपनीच्या रूग्णालयात आरएमओ म्हणून नोकरी करत होते. ते आयसीयूचे काम सांभाळत होते. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कंपनीने त्यांना पगार दिला नसल्याचा आरोप आहे. सध्या डॉ.गौरव यांना एक महिना वेतन न देता रजेवर रहाण्यास सांगण्यात आले, पण त्यांनी ते मान्य केले नाही.

डॉ. गौरव म्हणाले की त्यांनी कंपनी मुख्यालयात याविषयी बोलणी केली पण त्यांचे ऐकून घेण्यात आले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांची बदली गाझियाबाद येथे करण्यात आली. जेव्हा वाद वाढला तेव्हा त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. डॉ. गौरवने हरियाणाच्या सीएम विंडोवरही याबाबत तक्रार केली पण न्याय मिळत नाही हे पाहून त्यांनी रुग्णालयासमोर गाडीवर चहा विक्री करण्यास सुरवात केली. डॉ. गौरव शर्मा म्हणाले की, डिसेंबरमध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यांची बायकोही त्यांच्यासोबत चहा बनवत आहे.

कंपनीचे युनिट हेड म्हणाले- लॉकडाऊनमुळे पगार देण्यास अडचणी येत आहेत

कंपनीच्या करनाल युनिटचे प्रमुख म्हणाले की लॉकडाऊनमुळे पगार देण्यास अडचणी येत आहेत. डॉ. गौरवने दिलेले स्टेटमेंट योग्य नसून ते अनेक वेळा बेकायदेशीर कामे करताना देखील आढळले आहेत, त्यासंदर्भात त्यांना तीन-चार वेळा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटायला गेले पण डॉ. गौरव शर्मा यांनी भेटण्यास नकार दिला. जर एखादी बाब असेल तर ती बसूनच सोडविली जाऊ शकते. दुसरीकडे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला, परंतु उच्च स्तरावरून आदेश आल्यास चौकशी केली जाऊ शकते.