पाणीटंचाईमुळे कर्नाटकची महाराष्ट्राकडे 3 TMC पाण्याची मागणी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे कर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे तीन टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. कोयना आणि चांदोली धरणामध्ये गतवर्षीपेक्षा यंदा सुमारे 10 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंत्याने दिली आहे.

उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, रायचूर, गुलबर्गा जिल्ह्यात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कर्नाटकला कोयना आणि चांदोली या धरणासह उजनी धरणावर विसंबून राहावे लागत आहे.

ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्राने कोयना, चांदोली धरणातून तीन टीएमसी पाणी सोडावे अशी मागणी करणारे पत्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. उन्हाळ्यातील टंचाईच्या काळामध्ये कर्नाटकला पाणी दिले तर त्या पाण्याचे मूल्य चुकविण्यास कर्नाटक तयार आहे, मात्र आजअखेर पाण्याच्या बदल्यात अक्कलकोटसाठी पाणी देण्यात यावे अशी महाराष्ट्राची भूमिका राहिली आहे. यामुळे सध्या तरी कर्नाटकला पाणी देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.