वाढत्या कोरोना रुग्णांमुळे येडियुरप्पा सरकारचा मोठा निर्णय, कर्नाटकात उद्यापासून 14 दिवसांचा Lockdown

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. तरीही दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी यापूर्वीच दिल्ली, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू केला आहे. त्यातच आता कर्नाटक सरकारनेही उद्यापासून मंगळवार (दि. 27) राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याच्या निर्णय घेतला आहे. उद्या रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत.

कर्नाटक देशातील तिसरे कोरोना प्रभावित राज्य आहे. येथे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवांना सूट दिली आहे. दुकाने सकाळी 6 ते 10 पर्यंत म्हणजेच 4 तास सुरु राहतील. या व्यतिरिक्त इतर सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्राला परवानगी राहील. सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे. तसेच राज्य आणि राज्याबाहेर प्रवास करण्यास बंदी घातली आहे. अत्यावश्यक प्रकरणात सूट दिली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. तसेच दारुच्या होम डिलिव्हरीलाही मंजुरी दिली आहे. दरम्यान कर्नाटकात 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाईल असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्पष्ट केल आहे. कर्नाटकात आतापर्यंत 14 हजारांहून अधिक जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये एका दिवसात 29, 438 रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तर एका दिवसात 208 जणांचा मृत्यू झाला आहे.