’16 वर्षांनी सचिन वाझेंना परत घेताना पोलीस दलाची महान परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आलं नाही का?’ ‘या’ नेत्याची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   सचिन वाझे प्रकरणामुळे गृह मंत्रालयाने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना सचिन वाझेंना परत घेताना पोलीस दलाची महान परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आलं नाही का, असा सवाल केला आहे.संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हि टीका केली आहे.

काय म्हणाले केशव उपाध्ये

केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विट मध्ये ”ही महान परंपरा राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. सर्व नियम पायदळी तुडवत १६ वर्षानंतर सचिन वाझेसारख्या अधिकाऱ्याला परत घेताना ही परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आल नाही का? चुकीच काम झाली तर वावटळीच वादळात रूपांतर जनताच करेल”, असे म्हटले आहे.

काय म्हणाले संजय राऊत

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये “मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा,” असे म्हणले आहे.

काय आहे प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडणे, त्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू, त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक यामुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब झाली होती. विरोधकांनी मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप केला होता. यामुळे अखेर राज्य सरकारने परमबीर सिंह यांची बदली करून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली. तसेच परमबीर सिंह यांच्यावर गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. या बदल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज जाहीर केल्या.