खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला नांदेडमधून अटक, हिंदू संघटनेचे नेते होते रडारवर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – खलिस्तानी समर्थक दहशतवाद्याला नांदेड मधून अटक करण्यात आली आहे. सरबजीतसिंघ किरट असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याने हिंदुत्ववादी नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता. नांदेड पोलिस आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने ही कारवाई केली आहे. विमानाने त्याला आज (मंगळवार) सकाळी अमृतसर येथे नेण्यात आले.

सरबजीतसिंघ पंजाब मधील लुधियाना जिल्ह्यातील रहिवाशी आहे. खलिस्थान समर्थक इतर चार दहशतवादी यांच्यासह त्याने विदेशातुन निधी गोळा करणे, शस्त्र जमविणे यामध्ये तो सक्रिय होता. तसेच खलिस्तानी चळवळीला विरोध करणाऱ्या हिंदू नेत्यांच्या हत्येच्या कट त्याने रचला होता. या प्रकरणात अमृतसर येथे गुन्हा दाखल आहे. हा आरोपी पळून नांदेडमध्ये आला होता. पंजाब सीआयडी आणि स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्री संयुक्त कारवाई करुन किरट याला अटक केली.

सबरजितसिंघ याला नांदेडमध्ये अटक झाल्याने खलिस्तानी चळवळीचे नांदेड कनेक्शन समोर आले आहे. नांदेडमध्ये शिकार घाट परिसरातून त्याला अटक केली. तो खलिस्तान झिंदाबाद या संघटनेचा सदस्य आहे. या संघटनेला बेल्जियम येथून पैसा पुरवला जात असल्याचे उघडकीस आले आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर फरार आरोपी किरट हा नांदेडमध्ये लपला असल्याची माहिती पंजाब सीआयडीला मिळाली होती.