खेड शिवापूर टोलनाका बनावट पावती प्रकरण : घोटाळ्याचा आकडा सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक, 7 जणांना अटक : पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खेड शिवापूर टोलनाका बनावट पावती प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी 7 जणांना आतापर्यंत अटक केली असून, घोटाळ्याचा आकडा सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक जाण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सुरेश प्रकाश गंगावणे (वय 25, वाई, सातारा), अक्षय तानाजी सणस (वय 22), शुभम सीताराम डोलारे (वय 19, जनता वसाहत), साई लादूराव सुतार (वय 25, कात्रज), अजय काशीनाथ चव्हाण (वय 19), संकेत जयंत गायकवाड (वय 22), अमोल धनाजी कोंडे (वय 36) अशी अटक करण्यात आलेल्याची नवे आहेत. तर विकास आण्णा शिंदे (वाई सातारा), मनोज उर्फ दादा दळवी , सतीश मरगजे आणि हेमंत साठे फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पुणे सातारा बेंगलोर महामार्गावर खेड शिवापूर टोलनाका आहे. हजारो वाहने येथून दररोज ये जा करतात. पण गेल्या महिन्यात या टोलवर बनावट पावत्या देऊन वाहनांना सोडले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करत 7 जणांना अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना यात टोलमधील कोणी आहे का हे तपासले जात आहे. या टोलचे काम हे एका खासगी कंपनीकडे आहे. शासनाला टोलचा महसूल जातो. पण आरोपी हे 190 रुपयांची बनावट पावती तयार करत तसेच पुणे सातारा टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी देते असे सांगून वाहन चालकाकडून पैसे उकळत होते.

दरम्यान पोलिसांनी 24 तासांचा टोलचा रिपोर्ट काढला आहे. त्यात 3 हजार वाहने येथून जात असल्याचे दिसत आहे. त्यात 3 लाख 80 हजार बनावट पावत्या दिल्या असल्याचे दिसत आहे. यात जवळपास दोन महिन्यात 2 कोटी 28 लाख रुपयांचा टोल यामाध्यमातून वसूल केला असल्याचा अंदाज आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी तपास सुरू असून, यात आणखी कोणी सहभागी आहे का हे देखील पाहिले जात आहे.