सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सुभेदाराच्या कुटुंबाचे अपहरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सुभेदाराच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करुन त्यांचे अपहरण करण्याचा  प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करुन चौघांना पकडले. कोरेगाव पार्क भागात ही घटना घडली.

या प्रकरणी मोहम्मद रजा इमदाद अली बुºहानी (वय ३५), खालीद रजा (वय ३०, रा. कोंढवा), राम शाम मिरे (वय २४) , आशिष मनोहर धोत्रे (वय २५, दोघे रा. येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या बरोबर असलेल्या दोन साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त सुभेदाराच्या मुलीने याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादार महिलेचे वय ६० वर्ष आहे. तिच्या वडिलांचे वय ८५ वर्ष आहे. ते सैन्यदलातून सुभेदार पदावरुन निवृत्त झाले आहेत. कोरेगाव पार्क भागात ते राहायला आहे. शनिवारी दुपारी आरोपी त्यांच्या घरात आले. आमचे घर आहे. घर सोडा अशी धमकी त्यांना देण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुटुंबीयांना धमकावून ८५ वर्षीय वडिलांना मोटारीत बसवले आणि आरोपी पसार झाले, अशी फिर्याद निवृत्त सुभेदाराच्या मुलीने दिली आहे.

दरम्यान, आरोपी पसार झाल्यानंतर तिने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ही माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गणेश माने, दिनेश शिंदे, विनोद साळुंके, संदीप गायकवाड, रावसाहेब आदर्श यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर मोटारीतून जात असलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले. पोलीस निरीक्षक बहाद्दरपुरे तपास करत आहेत.