हरियाणात ‘स्मॉग इफ्फेक्ट ‘, एकापाठोपाठ ५० वाहने धडकून ७ जणांचा मृत्यू

चंदीगड : वृत्तसंस्था – दिल्लीतील स्मॉग इफ्फेक्ट मुळे झालेल्या अपघातांच्या मालिकेनंतर आता दिल्ली आणि हरियाणा दरम्यान रोहतक – रेवारी हायवेवर विचित्र अपघात झाल्याचंही माहिती मिळत आहे. या अपघातात किमान ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांमध्ये ६ महिलांचा समावेश असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. हायवेवर दाट धुक्यांमुळे अस्पष्ट दिसत असल्याने एकापाठोपाठ ५० गाड्या एकमेकांना धडकून हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
असा झाला अपघात 
दाट धुक्यामुळे रस्त्यावरील दृश्यात्मकता ५०० मीटरपेक्षा कमी झाली होती. त्यामुळे एका स्कूल बसचे नियंत्रण सुटले व त्यापाठोपाठ एक कार मागून येऊन या स्कूलबसला धडकली. यानंतर एकामागोमाग गाड्या एकमेकांवर धडकल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या विचित्र अपघातामुळे हायवेवर दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची गाड्यांमधून सुटका केली जात आहे.
हरयाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सकाळी दाट धुक्याची चादर पसरली असून रस्त्यावरील समोरील वाहने दिसणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत धुक्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तापमान कमी झाल्यावर हवेतील आद्रता वाढल्यामळे उत्तर भारतातवरच धुक्याची चादर पसरली आहे. काही भागात तर दुपारपर्यंत दाट धुके पसरलेले दिसून आले.