टॅक्स वाचवणाऱ्यांनो, सरकारचा तुमच्यावर आहे ‘डोळा’, 10 वर्षे होईल तुरुंगवास अन् 300 टक्के दंडही

नवी दिल्ली : भारतात टॅक्स वाचवण्यासाठी लोक विविध पर्याय वापरतात. इतकेच नाही तर काही लोक परदेशातही संपत्ती लवपून ठेवतात. आता या सर्वांवर कारवाई केली जाऊ शकते. परदेशात काळा पैसा लपवून ठेवणाऱ्या लोकांवर आयकर विभागाचा ‘डोळा’ असणार आहे. आयकर विभाग 400 पेक्षा जास्त लोकांवर काळा कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वीच काळा पैसा बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता सरकार कारवाईच्या विचारात आहे. काळ्या पैशांविरोधात 2015 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा कायदा बनवला होता. या कायद्यात तपासाची नवी संरचना तयार केली आहे. याशिवाय प्राथमिकतेच्या आधारे परदेशात जमा केलेल्या काळा पैसा किंवा अघोषित परदेशी संपत्तींची माहिती घेता येऊ शकणार आहे.

शिक्षेची तरतूद किती ?
काळा पैसा कायदा 2015 मध्ये परदेशात काळा पैसा लपवणाऱ्या नागरिकाला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच टॅक्स चोरी करणाऱ्याला 300 टक्के दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच परदेशातील संपत्तीसंबंधी रिटर्न दाखल न करणे किंवा अपूर्ण रिटर्न दाखल केल्यावर सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय रिटर्न भरताना परदेशातील बँक खात्यांची माहितीही द्यावी लागणार आहे.