पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना RBI ने केला रद्द, जाणून घ्या

ADV

कोल्हापूर : कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याची कारवाई ताजी असतानाच आरबीआयने कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

रिझर्व्ह बँकेने कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेच्या व्यवहारावर दोन महिन्यांपूर्वीच निर्बंध आणले होते. या बँकेच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात एकूण १३ शाखा आहेत. त्यांच्या १०० कोटींपर्यंत ठेवी आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षात अनेकांनी बँकेतील ठेवी काढून घेतल्या.

ADV

रिझर्व्ह बँकेने या बँकेवर कारवाई केली असली तरी ठेवीदारांचे पैसे परत देता येईल इतकी मालमत्ता बँकेकडे असल्याची माहिती पत्रात दिली आहे.

उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी २००३ मध्ये सुभद्रा लोकल एरिया बँकेची स्थापना केली होती. या बँकेत सुमारे १५० कर्मचारी काम करतात. पूर्वी स्टेट बँकेच्या कोषागार शाखेजवळ बँकेचे मुख्यालय होते. ते अलीकडील काही वर्षात जेम्सस्टोन संकुलात स्थलांतरीत झाले आहे. रिझर्व्ह बँकेने २ महिन्यांपूर्वी बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणल्याने फक्त कर्जवसुलीस प्राधान्य द्यावे, अशा सूचना होत्या. त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवानाच रद्द केला आहे.