दुसर्‍याबरोबर विवाह करणार याचा राग मनात धरून तरुणीचा खून

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मला सोडून दुस-याबरोबर विवाह करणार असल्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा खून करणा-या तरुणासह त्याच्या अन्य दोघा साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

आदर्श दत्तू पार्थनहळ्ळी, किरण केंचप्पा जगदाळ अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे, तर तर तिसरा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हारुगेरीतील (ता. रायबाग) येथील एका अल्पवयीन मुलीची आदर्शसोबत ओळख होती. या ओळखीतून आदर्शने नोव्हेंबर 2019 मध्ये अल्पवयीन मित्राच्या मदतीने तिचे अपहरण केले होते. आदर्श अल्पवयीन मुलीसोबत धारवाडमध्ये वास्तव्यास होता. दरम्यान, मे 2020 मध्ये त्याने निपानीजवळ एका गावात आपल्या मित्राच्या पाहुण्यांच्या घरी तिच्या राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र, त्या मुलीने दुस-या एका तरुणाशी विवाह करण्याची तयारी केली होती. त्याची कुणकुण आदर्शला लागली होती. मला सोडून दुस-याबरोबर विवाह करणार असल्याचा राग मनात धरून आदर्शने मित्र किरण व एका अल्पवयीन मुलाच्या साथीने तिच्या खुनाचा कट रचला.

आदर्शने तिला दोघा मित्राच्या सहाकार्याने 9 जून 2020 रोजी खानापूर तालुक्यातील कणकुंबी जंगलात आणले. तिथे तिला मद्य पाजून तिचा कोयत्याने गळा चिरण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी जंगलातच मृतदेहाची विल्हेवाट लावली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीसांनी विशेष पथक तयार करून आरोपींना शोधण्यासाठी मोहीम सुरू केली. तिची आदर्शसोबत जवळीक असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आदर्शला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने तिच्या खुनाची कबुली दिली. खुनासाठी वापरलेली दुचाकी, कोयता, मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.