अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीनं केला पत्नीचा पोटात चाकू भोसकून खून

बेळगाव : वृत्तसंस्था – अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा पोटात चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.18) रात्री बेळगाव येथील ऑटोनगर येथे घडली. याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. सखुबाई पुंडलिक लमानी (वय-32 रा. रामापूर लमानी तांडा, सध्या रा. ऑटोनगर) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लमानी दांपत्य मुळचे लमानी तांडा येथील असून कामानिमित्ताने ते ऑटोनगर येथे मागील काही वर्षापासून भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. पती पुंडलीक याचा पत्नी सखुबाईवर संशय होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते.

शुक्रवारी याच कारणावरुन दोघांमध्ये वाद झाले. या वादातून पुंडलीकने पत्नीच्या पोटात चाकू भोसकला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या गुन्ह्यातील आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.