कळंबा : जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या कैद्याचा खून; दोघांना घेतले ताब्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन कैद्यांनी मिळून एका कैद्याचा खून केला. कळंबा कारागृहात दोन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

उमेश राजाराम सामंत (रा. परुळे मांजर्डेवाडी, जि. सिंधुदुर्ग) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात उमेश सामंत हा गेल्या सात वर्षांपासून कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. रविवारी दुपारी कारागृहातील जनावरांच्या गोठ्यात जनावरांना चारा घालताना त्याचा दोन सहकाऱ्याबरोबर किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून त्याचा खून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. रविवारी गोठ्याजवळ चक्कर येऊन सामंत खाली पडला. तेथेच त्याचा मृत्यू झाला असे सहकारी कैद्यांनी सांगितले होते. त्यानंतर सरकारी रुग्णालयात मृतदेहाची अंतिम तपासणी केली असता, त्याच्या बरगड्यांना इजा झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात त्यांना खून झाल्याचे उघडकीस आले. दोन सहकाऱ्यांसोबत झालेल्या वादातूनच हा खून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव म्हणाले की, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सामंत याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या दोन्ही बाजूच्या बरगड्यांना मार लागला आहे. खुनाचा संशय आल्याने कारागृहात जाऊन अनेक कैद्यांची चौकशी केली. यावेळी विसंगत उत्तरे दिल्याने संशय बळावला आहे.

कोण होता उमेश सामंत
मृत उमेश सामंत हा राज्य परिवहन महामंडळात (एसटी ) वाहक होता. त्याने आपल्या मामाच्या मुलीशीच विवाह केला होता. किरकोळ कारणावरून त्याने पत्नीचा खून केला होता. खुनाचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी नातेवाईक व त्याच्या मुलांना कळवले. पण मुलांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यामुळे मंगळवारी त्याच्यावर पोलिसांनीच अंत्यसंस्कार केले होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने मात्र या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.