पाकिस्तानच्या कलम 370 च्या विरोधाला काश्मीरी युवकांचे ‘सडेतोड’ उत्‍तर, सैन्य भरतीसाठी 29 हजार अर्ज !

रियासी (जम्मू-काश्मीर) : वृत्तसंस्था – जम्मू्-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आकांडतांडव सुरु केला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर कोणताही देश पाकिस्तानला पाठिंबा देण्यास तयार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान एकाकी पडला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा नेण्याचा पाकचा प्रयत्न फसल्यानंतर आता दहशतीचा मार्ग अवलंबला आहे. पाकिस्तानकडून केला जाणारा खोटा प्रचार, पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या अशा कोणत्याही गोष्टींना बळी न पडता जम्मू-काश्मीरमधील तरुण सैन्यभरतीत उतरले आहेत. कश्मीरमधील रियासीतील सैन्य भरती शिबिरात पहिल्याच दिवशी 29 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.

यापूर्वी 500 हून अधिक काश्मिरी जवानांनी पासिंग आउट परेडमध्ये भाग घेऊन पाकिस्तानला सणसणीत चपराक हाणली होती. दहशतीचा मार्ग अवलंबून काश्मीर खोऱ्यातील मुस्लिम जनतेला भडकावण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून चालू झाला असताना काश्मिरी जनतेने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. आता जम्मू-काश्मीरच्या रियासी येथे सैनिक बनू इच्छित असलेल्या हजारो तरुणांची गर्दी उसळली आहे. त्यांना पाकिस्तनाला उत्तर द्यायचे आहे. त्यांना बंदूक हातात घ्यायची आहे.हे हे तरुण दहशतवाद्यांना घाबरत नाहीत किंवा जैश-लष्करची चिंता करीत नाहीत. नवीन काश्मीरमधील या तरुणांना दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी सैनिक बनायचे आहे.

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत सामान्य होत आहे. गेल्या काही दिवासांपासून राज्यातील लोकांना अनेक बंदीमुळे अडचणीचा सामना करावा लागला होता. पण आता काश्मीर पुन्हा सुरळीत सुरु झाले आहे. काश्मीर खोऱ्यातील अनेक तरुण देशसेवा करण्यासाठी पुढे आले आहेत.