उत्कृष्ट गोळाफेक पटू कृष्णा पुनीया बनली आमदार

राजस्थान : वृत्तसंस्था – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले याच यशाचा फायदा खेळाडूंना देखील झाला आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकीत राष्ट्रकूल स्पर्धेतील माजी सुवर्ण पदक विजेती गोळाफेकपटू कृष्णा पुनिया हीने देखील काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. आणि विशेष बाब म्हणजे ती या निवडणुकीत निवडूनही आली आहे. तिने राजस्थानमधील सदलपूर या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत ती तब्बल ती १८ हजारापेक्षा अधिक मतांनी निवडून आली आहे. राजकारणाच्या मैदानात उतरण्याची ही तिची दुसरी वेळ आहे. या आधी २०१३ मध्ये तिने निवडणुक लढविली होती. त्या निवडणूकीत ती पराभूत झाली होती. राजस्थान मध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने तीचा विजय झाला आहे.

नॅशनल ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कृष्णाने 11 ऑक्टोबर 2010 रोजी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल खेळाच्या अंतिम सामन्यात क्लीन स्वीप साफ करून 61.51 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. आता  मात्र राजकारणात सफल ठरली असून खेळाडू अस्लम शेरखान, चेतन चौहान, नवज्योतसिंह सिध्दू, राज्यवर्धन राठौड, ज्योतीर्मयी सिकंदर, किर्ती आझाद यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.

ज्या प्रमाणे कृष्णाने निवडणूक लढवली त्याचप्रमाणे मिझोरममधील निवडणूकीत देखील ऐझवाल फुटबॉल क्लबचे मालक रॉबर्ट रॉयटे यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवली आणि या निवडणूकित त्यांचा विजय झाला. मिझोरम येथील पूर्व २ मतदारसंघातून ते मिझो नॅशनल फ्रंटकडून निवडून आले आहेत.

या बरोबरच काँग्रेस पक्षाचे नवज्योतसिंग सिध्दू हे पंजाबच्या सध्याच्या मंत्रिमंडळात पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आहेत. या मंत्रिमंडळात येण्याआधी ते भाजपाचे खासदार देखील राहिलेले आहेत. चेतन चौहान हे उत्तरप्रदेश मध्ये भाजपा सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहेत. यांच्यासह अन्य खेळाडूंनी देखील निवडणूका लढविल्या आहेत काहींना विजय प्राप्त झाला तर काहींना पराभवाला सामोरे जावे लागले.