‘…तर आयडिया – वोडाफोन बंद करू’, कुमार बिर्लांचं मोठं विधान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिग्गज टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटलं आहे की, जर अपेक्षेप्रमाणे सरकारी मदत मिळाली नाही तर वोडाफोन-आयडिया बंद करू. ट्रायनं जाहीर केलेल्या नव्या माहितीनुसार, वोडाफोन-आयडियाकडे 37.5 कोटी ग्राहक आहेत. अशात कोटींच्या संख्येत असणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

बिर्ला ग्रुप कंपनीत गुंतवणूक करणार नाहीत
दिल्लीतील एका कार्यक्रमात कुमार बिर्लांनी संकेत दिले आहेत की, सरकारकडून कोणताही दिलासा मिळाला नाही तर त्यांचा समूह कंपनीत कोणतीही गुंतवणूक करणार नाही. पैसे बरबाद करण्यात काहीच अर्थ नाही असं त्यांनी म्हटलं आहे. जर एजीआरवर सरकारडून कोणताही दिलासा मिळाला नाही तर कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेचा पर्याय निवडेल.

कॉर्पोरेट इतिहासात पहिल्यांदाच कंपनीला सर्वात मोठं तिमाही नुकसान
सुप्रीम कोर्टाकडून एजीआर वर देण्यात आलेल्या निर्णयाचा वोडाफोन-आयडियावर सर्वात जास्त परिणाम झाला आहे. कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 50 हजार कोटींहून अधिक नुकसान झालं आहे. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील हे सर्वात मोठं तिमाही नुकसान आहे. जिओ लाँच झाल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रात टिकून राहण्यासाठी कुमार बिर्लांनी आपली आयडिया सेल्युलर ही कंपनी वोडाफोन इंडियात विलीन केली होती. यानंतर नवी कंपनी वोडाफोन-आयडिया अस्तित्वात आली. या करारानुसार वोडाफोन-आयडिया या नव्या कंपनीत 45.1 टक्के भागिदारी वोडाफोन-आयडियाकडे आहे. तर 26 टक्के भागिदारी आदित्य बिर्ला ग्रुपकडे आहे. इतर भागधारकांकडे 28.9 टक्के भागिदारी आहे.

Visit : Policenama.com