एवढी गर्दी तर आपण पान ठेल्यावर गाडी थांबवल्यावर जमा होते : लालुचा मोदीना टोला

पाटणा : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणूका जशा जवळ येईल, तसे राजकीय पटलावर निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. तसेच निवडणुकांच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व पक्ष आत्तापासूनच आपआपल्या स्तरावर गर्दी एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभेमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, बिहारच्या राजकारणातील बादशाह मानल्या जाणाऱ्या लालू प्रसाद यादव यांनी या सभेवर असे वक्तव्य केले आहे की काही क्षणासाठी मोदीही चक्रावून जातील.

पंतप्रधान मोदींनी पाटण्याच्या गांधी मैदानामध्ये जनसभेस संबोधित केले. येथे मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. मात्र, लालू प्रसाद यादव यांना ही गर्दी काहीच वाटत नाही. एवढी गर्दी तर आपण पान ठेल्यावर गाडी थांबवल्यावर जमा होते, असे म्हणून लालूंनी मोदींच्या सभेची चक्क खिल्ली उडवली. त्यांनी आपल्या ट्विटरवरून हे वक्तव्य केले आहे.

नरेंद्र मोदी, नीतीश कुमार आणि रामविलास पासवान यांनी सरकारी तंत्राचा उपयोग करून महिनाभरात जितकी गर्दी जमा केली, तेवढी गर्दी तर मी एखाद्या पान ठेल्यावर गाडी थांबवल्यावर जमा होते, असे यादवांनी ट्विटरवर लिहिले आहे. तर, गर्दी दाखवण्यासाठी एक सल्लाही लालू प्रसाद यादवांनी मोदींना दिला. ते म्हणाले, की कॅमेरा झूम करा जेणेकरून मोठ्या प्रमाणात गर्दी दिसेल.

बिहारमध्ये नीतीश कुमार आणि भाजपने मिळून सत्ता संपादन केली आहे. यापूर्वी लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि नीतीश कुमारांचा जनता दल (युनाईटेड) यांचे सरकार होते. लालू प्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणावरून तुरुंगात बंद आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते अद्यापही राजकारणात किती सक्रिय आहेत, हे दिसून येते. तर, नेहमीप्रमाणे विनोदी वक्तव्य करत गंभीर मुद्दे ते सहजच मांडतात याचीही प्रचिती येते.