अनधिकृत स्फोटके विक्री करणारे दोघे गजाआड

ठाणेः पोलीसनामा आॅनलाईन
अनधिकृतपणे स्फोटकांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना 100 डेटोनेटर व 199 जिलेटीनच्या कांड्यासह गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने अटक केली आहे. याप्रकरणी अशोक रामदास ताम्हणे ( वय:28, रा. सावळे, ता.कर्जत, जि. रायगड), समीर मारुती धुळे (वय:24, रा. सावळे, ता. कर्जत, जि. रायगड) या दोघांविरुद्ध भारतीय स्फोटक अधिनियम 5,6 नुसार मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजु जाॅन यांना आपल्या गुप्त खबऱ्या मार्फत दोन इसम अनधिकृतपणे स्फोटक विक्रीसाठी चारच्या सुमारास खोणी गावाच्या पुढे तळोजाकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट:3,व बाॅम्ब शोधक व नाशक पथक कल्याण यांनी सापळा रचला असता,चार वीसच्या दरम्यान तळोजा रोडवरील पागऱ्याच्या पाड्याकडून खोणीगावात जाणाऱ्या रस्त्यावर दोन अज्ञात इसम मोटार सायकलवरुन येऊन खांद्याला दोन सॅक लावून थांबल्याचे दिसले.

खबऱ्याने दिलेल्या वर्णनाप्रमाणे दोन्ही इसम व त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. अतिशय शिताफिने दोघांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता जिलेटीन ट्युबचे 199 नग व सफेद रंगाचे वायरींग असलेली इलेक्ट्रीक डिटोनेटरचे 100 नग असे स्फोटक पदार्थ सापडले. बीडीडीएस पथकाकडून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी केल्यानंतर सदरची स्फोटके विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडून जप्त केलेली स्फोटके कोठून आणली व कोणाला विक्री करणार होते? तसेच दहशतवादी कृत्यासाठी त्याचा वापर करणार होते का? याबाबतचा अधिक तपास पोलीस
उप-निरीक्षक निरी हे करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त परम बीर सिंग. सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर पांण्डे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे शाखा ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त अभिषक त्रिमुखे, ठाणे पोलीस आयुक्त गुन्हे शोध चे मुकुंद हतोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-3, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जाॅन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस उप- निरीक्षक नितीन जोगमार्ग, पोलीस हवालदार विश्वास चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र घोलप, पोलीस नाईक सतीश पगारे, पोलीस नाईक प्रकाश पाटील, पोलीस नाईक हर्षल बांगारा, पोलीस शिपाई अजित राजपुत, महिला पोलीस शिपाई स्वाती राहणे, तसेच बीडीडीएस पथक, कल्याणचे पोलीस उप- निरीक्षक रोकडे व सहकारी आणि पथकातील श्वान टायगर यांनी केली.

अनधिकृत स्फोटके विक्री करणारे दोघे गजाआड