अटलजींचा अस्थी कलश दर्शनासाठी पुण्यात

 पुणे: पोलिसनामा ऑनलाईन

भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी १६ ऑगस्ट रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थी कलशाचे दर्शन पुण्यात घेता येणार आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थी कलश  गुरुवार,  २३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी ३ या वेळेत जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान तसेच भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पालकमंंत्री गिरीश बापट  मुंबईहून पुण्याला अस्थी कलश आणणार आहेत. याबाबतची माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे. पुण्यात अस्थी कलश आणल्यानंतर कलशाची पूजा करण्यात येणार आहे. या पूजेनंतर  तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीत अटलजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील १३ नद्यांमध्ये होणार अटलजींच्या अस्थींचे विसर्जन
दरम्यान, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवार दि. २२ ऑगस्ट रोजी मुंबईत सभेचे आयोजन करण्यात आले.  याच  दिवशी प्रदेशाध्यक्ष खासदर  रावसाहेब पाटील दानवे नवी दिल्ली येथून अटलजींचा अस्थी कलश मुंबईत आणणार असून राज्यातील विविध नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिली. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बुधवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी अटलजींच्या अस्थी मुंबई येथे आणण्यात येणार असून अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत नरिमन पॉइंट येथे एनसीपीए सभागृहात सायंकाळी ६ वाजता सभेचे आयोजन केले आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातील विविध नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबई, पंढरपूर, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कराड, कर्जत, महाड व सांगली येथे नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येईल. मुंबईत श्रद्धांजली सभास्थानी अस्थी कलश हस्तांतरित करण्यात येतील. अटलजींचा अस्थी कलश विसर्जनासाठी घेऊन जात असताना नागरिक व कार्यकर्ते वाटेत ठिकठिकाणी पुष्पांजली अर्पण करतील. अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान सुधीर  मुनगंटीवार यांनी दिली.