अफगाणिस्तानमधील भीषण आत्मघाती हल्ल्यातील मृतांची संख्या 18, विद्यार्थ्यांचा समावेश, 57 जखमी

काबूल (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यातील मृतांची संख्या 18 झाली आहे. मृतांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असून एकुण 57 लोक जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोट पश्चिम काबूलच्या दस्त ए बारची येथील शिया बहूल भागात एका शैक्षणिक केंद्राबाहेर झाला. हल्लेखोर शिक्षण केंद्रात घुसण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखल्यानंतर हा स्फोट झाला, अशी माहिती गृहमंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अरियान यांनी दिली आहे.

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. या बॉम्बस्फोटची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. दरम्यान, तालिबानने हा हल्ला आपण केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शनिवारच्या बॉम्बस्फोटापूर्वी पूर्व अफगाणिस्तानमध्ये रस्त्याच्या कडेला झालेल्या बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटामध्ये एक कॅश व्हॅन उध्वस्त झाली होती. अन्य स्फोटात दोन पोलीस कर्मचारी ठार झाले होते. हे पोलीस कर्मचारी अगोदरच्या स्फोटातील जखमींना मदत करण्यासाठी जात होते.

ऑगस्ट 2018 मध्ये इस्लामिक स्टेटशी संबंधित एका संघटनेने असा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 34 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट अल्पसंख्याक शिया, शिख आणि हिंदूंवर हल्ले करत आहे. काबूलमध्ये इस्लामिक स्टेटच्या समर्थकाने बूलमध्ये धार्मिक स्थळावर हल्ला करून 25 नागरिकांना ठार केले होते. या घटनेनंतर भयभित झालेल्या शेकडो हिंदू आणि शिया समुदायातील व्यक्तींनी देशातून सप्टेंबरमध्ये पलायन केले होते.