COVID-19 : मुंबईला मागे टाकत राजधानी दिल्ली झाली ‘कोरोना’ कॅपिटल, धक्कादायक कारण आलं समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी दिल्लीत सर्वाधिक 3460 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीमध्ये 24 तासांच्या आत कोरोना संसर्गामुळे 63 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाची एकूण प्रकरणे 77 हजार 240 झाली आहेत तर कोरोनाच्या संसर्गामुळे 2492 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांच्या बाबतीत दिल्लीने मुंबईला खूपच मागे टाकले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं
सर्वोच्च न्यायालयाने 12 जून रोजी कोरोनाबद्दल दिल्ली सरकारला फटकारले होते. दिल्ली सरकार कोरोना रुग्ण व मृतदेहाचे योग्य व्यवस्थापन करत नाही. कोरोना रुग्णांना येथे प्राण्यांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचे कोर्टाने म्हटले होते. गेल्या तीन दिवसांमध्ये दहा हजारांहून अधिक कोरोनाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

चाचण्यांसाठी दिल्ली सरकारला मोफत साहित्य
गृहमंत्री अमित शहा यांनी पदभार स्वीकारल्यापासून दिल्लीत बरेच बदल झाले आहेत दिल्लीत जास्तीत जास्त चाचण्यांद्वारे केंद्र सरकार कोरोना रुग्णांवर वेळेवर उपचार सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आयसीएमआर 4.7 लाख आरटी-पीसीआर चाचण्या करण्यासाठी दिल्ली सरकारला किमान साहित्य मोफत दिले आहे. याशिवाय आयसीएमआरच्या वतीने दिल्ली सरकारला 50 हजार रॅपिड एंटीजन टेस्ट किट्सदेखील विनामूल्य देण्यात आल्या आहेत. आजपासून दिल्लीत सेरोलॉजिक सर्वेक्षण सुरु झाले आहे.