PCMC : सावकाराच्या त्रासाला वैतागून कंपनी मालकाची आत्महत्या

ADV

भोसरी : पोलीसनामा ऑनलाईन

मुलाने सावकाराकडून काढलेल्या कर्जाची रक्कम वडीलांकडून वसूल करण्यासाठी सावकरांनी लावलेल्या तगाद्याला वैतागून वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (दि.६) मोशी येथील ग्लास फायबर इंजस्ट्रीज कंपनीत घडला. याप्रकरणी मुलासह चारजणांवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास साहदु सातव (वय-७२) असे आत्महत्या केलेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुजित रामदास सातव, सोपान सस्ते, धनंजय सस्ते आणखी एक इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उमेश रामदास सातव (वय-४० रा.मोशी) यांनी फिर्य़ाद दिली आहे.

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सातव यांची मोशी येथे ग्लास फायबर इंड्स्ट्रीज नावाची कंपनी आहे. त्यांचा मोठा मुलगा सुजित याला नारायण गव्हाण येथे जमीन खरेदी करायची होती. त्यासाठी त्याने सोपान आणि धनंजय सस्ते यांच्याकडून दोन टक्के व्याजाने २५ लाख रुपये घेतले.

दरम्यान सुजित याला पैसे परत करणे जमले नाही. त्यामुळे सस्ते बंधुंनी रामदास सातव यांच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच त्यांच्याकडून पैसे देण्याचे लिहूनही घेतले. सस्ते यांनी कंपनीत जावून पैशांसाठी तगादा लावला. रविवारी (दि.६) सस्ते आणि सुजित कंपनीत आले. त्यांनी रामदास यांच्याकडे पैशांची मागणी करुन शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. तर फिर्यादी उमेश सातव यांना जिवे मारण्याची धमकी दिली. मुलाच्या आणि सावकारांच्या त्रासाला वैतागून रामदास सातव यांनी कंपनीच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

उमेश सातव यांनी दिलेल्या फिर्य़ादेवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एच.बी. कोकणी करीत आहेत.