…तर सरकार हे कायदे तात्काळ रद्द करेल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आश्वासन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांनी देशात नवे कृषी कायदे किमान एक किंवा दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू करण्याची तयारी दाखवावी. जर या कायद्यांमधून शेतकऱ्यांना कोणताही फायदा झाला नाही, तर सरकार हे कायदे तात्काळ रद्द करेल, असे आश्वासन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh ) यांनी दिले आहे.

द्वारका येथील एका रॅलीला ते संबोधित करत होते. कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर आंदोलनाला बसलेले शेतकरी आहेत. शेतकऱ्यांप्रती सरकारला पूर्ण आदर आहे. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे हिताचे नसेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यासोबत खंबीरपणे उभे आहेत, असे राजनाथ सिंह म्हणाले.

शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची सरकारला जाण असून कोणत्याही समस्येवर चर्चेनेच तोडगा निघतो. पंतप्रधान मोदींनाही शेतकऱ्यांसोबत चर्चा करायची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे, असे राजनाथ यावेळी म्हणाले. आंदोलक शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे येऊन सरकारसोबत चर्चेची तयारी दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.