Liver : चुकीची जीवनशैलीमुळे यकृताच्या कार्यात अडथळा, ‘ही’ काळजी घ्या

पुणे : सद्यस्थितीमध्ये सुरु असलेल्या महामारीच्या परिस्थितीत 25-45 वयोगटातील तरुण व्यक्तीमध्ये यकृताच्या समस्या वाढल्या आहेत. दारूचे सेवन, व्यायामाचा अभाव, आहाराच्या चूकीच्या सवयी ही कारणे यकृताच्या कार्यात अडथळा आणण्यास कारणीभूत ठरत आहेत. यकृताचे कार्य सुरळीत चालण्यासाठी दर 6 महिन्यांनंतर यकृताच्या कार्याची चाचणी (एलएफटी) करणे गरजेचे आहे. संतुलित आहार घेणे, दररोज व्यायाम करणे आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे नक्कीच फायदेशीर ठरेल.

गेल्या काही वर्षापासून सुरु असलेल्या महामारीच्या संकटामुळे नागरिकांना घरी रहावे लागले असून घरबसल्या सुरु असलेली कामं, बाहेर पडण्यावर येणारी बंधंने या सा-यामुळे शारीरीक हलचाल मंदावल्याचे दिसून येते. घरबसल्या वेळी अवेळी खाणे, मद्यपान करणे, संतुलित आहाराची कमतरता या सा-यामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. संसर्गाच्या भितीमुळे यकृताच्या कार्याची चाचणी करण्यात टाळाटाळ केल्याने अनेकांमध्ये यकृताच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

डॉ. संजय इंगळे, पॅथॉलॉजिस्ट, आणि झोनल टेक्निकल हेड वेस्ट इंडिया, अपोलो डायग्नोस्टिक्स, पुणे सांगतात की नॉनअल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी), लिव्हर सिरोसिस, इन्फेक्टीव्ह हेपेटायटीस, अल्कोहोलिक हेपेटायटीस आदींमुळे यकृताचे नुकसान होऊ शकते. बर्‍याच लोकांना त्यांच्या यकृत समस्यांविषयी माहिती नसते ज्यामुळे मृत्यूची संख्या आणि रुग्णांची रुग्णसंख्या वाढते.

डॉ संजय इंगळे सांगतात यकृताच्या समस्येवर उपचार करणे म्हणजे डॉक्टरांची औषधे, शस्त्रक्रिया आणि यकृत प्रत्यारोपणासारखा पर्याय अवलंबविणे फायदेशीर ठरते. लठ्ठपणामुळे नॉनअल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) होतो म्हणून योग्य वजन राखण्यासारख्या निरोगी जीवनशैली स्विकारणे नक्कीच फायदेशीर ठरेल.फायबरयुक्त आहाराचे सेवन करणे आणि उच्च कॅलरी, कार्बोहायड्रेट्स व चरबीचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक आहे. भरपूर पाणी पिणे, दररोज व्यायाम करणे, इंजेक्शन घेण्याच्या असुरक्षित पद्धती आणि दूषित सुयांचा वापर टाळणे, मद्यपान करणे, वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे, हेपेटायटीस बी विरूद्ध लसीकरण करणे आणि प्रत्येक 6 महिन्यांनंतर यकृताच्या कार्याची चाचणी करणे आवश्यक आहे. यकृताचे आरोग्य तपासण्यासाठी अनेक रक्त चाचण्या केल्या जातात कारण ते यकृत संसर्ग, रोग आणि हानीचे निदान करण्यास मदत करतात.