चीनमध्ये जगणं झालं ‘कठीण’, ‘कोरोना’नंतर आता ‘बर्ड फ्लू’चा धोका

बीजिंग : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार उडवलेला असतानाच आता दुसरे एक संकट चीनवर आले आहे. चीनमधील हुनान प्रांतात एका प्रोल्ट्रीतील कोंबड्यांना एच5 एन1 ची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कोरोना व्हायरसला तोंड देण्यात आपली सर्व शक्ती पणाला लावणार्‍या चीनला आता बर्ड फ्लूला सुद्धा तोंड द्यावे लागणार आहे. चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसमुळे 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू पसरल्याचे वृत्त दक्षिण चीन मॉर्निंग पोस्ट वृत्तपत्रात देण्यात आले आहे. चीनच्या कृषी व ग्रामीण परिस्थितीबाबत शनिवारी मंत्र्यांसोबत चर्चा झाली असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. बर्ड फ्लू पसरल्याची माहिती शयोयांग शहरातील शुआनक्विंग जिल्ह्यातील एका फार्ममधून समजली. या फार्ममध्ये 7850 कोंबड्या असून 4500 कोंबड्यांना संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकार्‍यांनी संसर्ग झाल्यानंतर 17828 कोंबड्या मारल्या.

सध्या तरी हुनानमध्ये एच5एन1 मुळे कोणत्याही व्यक्तीला संसर्ग झाल्याचे प्रकारण समोर आलेले नाही. एच5एन1 फ्लू व्हायरसला बर्ड फ्लू असेही म्हटले जाते. या आजारामुळे पक्षांना श्वास घेण्यास त्रास होतो. कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यात गुंतलेल्या चीन समोर आता एच5एन1 ची संकट उभे ठाकले आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा 14,380 लोकांना संसर्ग झाला आहे.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आपत्ती जाहीर केली आहे. कोरोना व्हायरसने चीनमध्ये 300पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. तसेच 15 हजारहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे. चीन गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. पण त्याचवेळी कोरोना व्हायरसविरूद्ध चीन ही लढाई जिंकेल, असा विश्वास चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी व्यक्त केला आहे. या व्हायरसला तोंड देण्यासाठी चीनने येत्या वुहानमध्ये 1300 खाटांचे आणखी एक तात्पुरते रुग्णालय बांधण्यास सुरूवात केली आहे.