येत्या रविवारी सर्व सरकारी बँका राहणार सुरू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – सरकारी देवाण घेवाण करणाऱ्या सर्व सरकारी बँकाच्या शाखा येत्या रविवारी म्हणजेच ३१ मार्च रोजी सुरुच राहणार आहेत. येत्या ३१ मार्च रोजी रविवार असला तरी हा चालू आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकारी देवाण घेवाण करणाऱ्या बँकांना आपल्या शाखा सुरु ठेवण्याचे रिझर्व बँकेने आदेश दिले आहेत. त्यामुळे सरकारी बँका आता रविवारी सुरू असणार आहेत.

रिझर्व बँकेने याबाबत एक पत्रकही जारी केले आहे. त्या पत्रकात म्हटलं आहे की, “सरकारी देवाण घेवाणीसाठी ३१ मार्च २०१९ रोजी सरकारचे सर्व पे अॅण्ड अकाऊंट्स सुरू राहणार आहेत. त्यामुळे सर्व एजन्सी बँकांनी सरकारी व्यवसाय करणाऱ्या त्यांच्या शाखा रविवारी सुरू ठेवाव्यात.”

याशिवाय आरबीआयने जारी केलेल्या पत्रकात असेही म्हटले आहे की, “सरकारी देवाण घेवाणीचे व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांच्या शाखा शनिवार ३० मार्च रोजी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि ३१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवाव्यात. तसेच RTGS आणि NEFT सह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक देवाण घेवाणीचे व्यवहारसुद्धा ३० आणि ३१ मार्च रोजी अतिरिक्त वेळेपर्यंत सुरू राहतील.”