तलाठ्याची ‘मुजोरी’ ; ..म्हणून जिल्हाधिकाऱ्यांवरच उचलला हात

ADV

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात अनेक भागात वाळू माफीया मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात वाळू तस्करांची मुजोरीही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना अडवण्यासाठी कोणी गेले तर त्यावर हल्ले होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. परभणीतही असंच काहीसा प्रकार घडला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे तस्कर वाळूचा बेसुमार उपसा करतात. त्यांना रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यावरच तलाठ्याने हात उचलल्याची धक्कादायक घटना पूर्णा तालुक्यात घडली आहे.

पूर्णा तालुक्यातील गोदावरी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा सुरु होता. तो रोखण्यासाठी परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर जात होते. तेव्हा त्यांच्यावर वसमत तालुक्यातील रिधुरा सज्जाचा तलाठी धावून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर शिवशंकर यांनी पोलिसांत तक्रार दिली असून तलाठ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अवैध होणारा वाळू उपसा आणि वाळू तस्कारांच्या विरोधात पी शिवशंकर यांनी मोही उघडली आहे. त्यासाठी ते रविवारी रात्री स्वतः आपल्या गाडीमधून पूर्णा तालुक्यात कानडखेड येथे कारवाईसाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीच्या पाठीमागे एक इसम येताना त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी गाडी थांबवून त्याची चौकशी केली. पण त्याला आपण जिल्हाधिकारी असल्याचं सांगितलं नाही. वाळू तस्करीबाबत बोलताच तो जिल्हाधिकाऱ्यांवरच धावून गेला आणि हातही उगारला. मात्र त्यांच्या अंगरक्षकांनी त्याला रोखलं. त्यामुळे शिवशंकर हे सुखरुप आहेत.

दरम्यान, खंडू पुजारी असं या तलाठ्याचं नाव आहे. त्याला शिवशंकर हे जिल्हाधिकारी असल्याचे समजल्यावर, त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अंगरक्षकाने त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. हा तलाठी वाळू तस्करांना मदत करतो का ?, याचीही पोलीस चौकशी करत आहेत.