आता लातूर जिल्ह्यातही लॉकडाऊनची घोषणा, 15 दिवसांसाठी Lockdown

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात वाढत चाललेला कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता 15 जुलै पासून जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी घोषित केले आहे. या संदर्भातील अधिक तपशील जिल्हाधिकारी जी. श्रीकांत लवकरच जाहीर करतील असे त्यांनी म्हंटले आहे.

अनलॉक 2 च्या काळात बऱ्याच व्यवस्था सुरू झाल्या आहेत, मात्र या काळात रेडझोनमधून अनेक प्रवाशी जिल्ह्यात आले आहेत. परिणामी कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही साखळी तोडणे आवश्यक बनले आहे. एकंदरीत परिस्तिथीतिचा विचार करता संभाव्य धोका टाळण्यासाठी लातूर जिल्ह्यात 15 ते 30 जुलै दरम्यान पुन्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हंटले आहे. लॉकडाऊनमध्ये कोणत्या सुविधा कशा प्रकारे सुरू राहतील याचा तपशील जिल्हाधिकारी जी श्रीकांत लवकरच जाहीर करतील असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचे 750 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर 34 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी, लोकप्रतिनिधीसोबत जनतेतूनही लॉकडाऊनची मागणी होत होती. त्या अनुषंगाने अमित देशमुख यांनी आज लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी याची फेसबुक लाइव्हमध्ये माहिती दिली. शिवाय या लॉकडाऊनच्या काळात या बंद राहील व काय सुरु राहील याची सविस्तर माहिती सोमवारी (दि.13) सायंकाळपर्यंत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.