Lockdown 3.0 : पुण्यातील 69 प्रतिबंधित क्षेत्रामधील (containment zones) जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 17 मे पर्यंत बंद !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं पुण्यात कहर केला आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मनपा आणि जिल्हा प्रशासनानं कोरोना रूग्णांच्या चाचण्या करण्याचं प्रमाण देखील वाढवलं आहे. दिवसाला सुमारे 80 ते 100 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहे. दरम्यान, शहरात लॉकडाऊनचं कडेकोट पालन व्हावं यासाठी देखील पोलिस प्रशासन आणि मनपा प्रशासन अटोकाट प्रयत्न करीत आहे.

लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तू आणि पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात काही मोजक्या वेळेसाठी सूट देण्यात आली होती. मात्र, अत्यावश्यक सेवा देणार्‍या दुकानांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरातील 69 प्रतिबंधित क्षेत्रातील दवाखाने वगळून अन्य सर्व दुकाने आता 11 मे 2020 च्या मध्यरात्रीपासून ते 17 मे 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

शहरातील 69 प्रतिबंधित क्षेत्रातील कुठलेच दुकान आता उघडता येणार नाही हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यंत आवश्यकता भासल्यास दुध आणि भाजीपाला तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा पुणे महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता घरपोच किंवा या क्षेत्राच्या आत मोठया मोकळया जागेवर सुरक्षित अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) पालन करून उपलब्ध करून देता येणार आहे.