Lockdown 3.0 : मुंबई-पुण्यासह पिंपरी-चिंचवड अन् मालेगावात दारू दुकाने उघडणार नाहीत : आयुक्त कांतीलाल उमाप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाने शनिवारी सायंकाळी जारी केलेल्या सूचनांनुसार मुंबई, पुणे आणि मालेगाव या कंटेंमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत दारु दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी पोलीसनामा ऑनलाइनसोबत बोलताना सांगितले.

राज्याचा महसुल मोठ्या प्रमाणावर बुडत असल्याने दारु दुकानांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मात्र, राज्य शासनाने रेड झोनमध्ये असलेल्या महापालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारची दुकाने उघडण्यास मनाई केली आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई आणि मालेगाव येथील दारुची दुकाने उघडणार नाहीत, असे उमाप यांनी पोलीसनामा ऑनलाइन सोबत बोलताना सांगितले. शनिवारी जारी केलेल्या सूचनेमध्ये काही सुधारणा केल्याशिवाय अशा प्रकारे दारुच्या दुकानांना परवानगी मिळणार नाही. तसा प्रस्ताव अजूनही शासनाकडून आलेला नाही.
पुणे महापालिका क्षेत्रालगत पुणे, खडकी आणि देहरोड कँटोंमेटची हद्द येते. मात्र, या क्षेत्रातील दुकानांबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर, अगोदर जिल्हाधिकार्‍यांना मदत आणि पूनर्वसन विभागाकडून आवश्यक ते स्पष्टीकरण मागवावे लागेल. त्यांच्याकडून जिल्हाधिकार्‍यांना परवानगी मिळाल्यानंतर ते त्याबाबत आवश्यक तो निर्णय घेऊ शकतील, असे कांतीलाल उमाप यांनी सांगितले. आतापर्यंत शासनाकडून शनिवारी जारी केलेल्या सूचनेत काही सुधारणा करण्याविषयी काहीही माहिती पुढे आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी पुण्यासह पिपंरी चिंचवड, मुंबई आणि मालेगाव महापालिका क्षेत्रात दारुची दुकाने उघडणार नाहीत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड लगतच्या भागातही
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या बाजुला असलेल्या खेडया-पाडयात अथवा जिल्हयातील महामार्गावरील मद्यविक्रीबाबत आम्हाला अद्याप आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडून आदेश आलेतरच लगतची दुकाने उघडण्याबाबत कारवाई करण्यात येईल. मात्र, या क्षणालातरी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या भागातील दुकाने उघडण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही अशी माहिती आयुक्त कांतीलाल उमाप यांनी पोलीसनामा ऑनलाइनशी बोलताना दिली.

आयुक्त कांतीलाल उपाम यांनी रविवारी सायंकाळी 4.40 वाजता पोलीसनामा ऑनलाईनशी बोलताना ही सविस्तर माहिती दिली आहे. दरम्यान, यानंतर शासनाने दारू दुकाने उघडण्याबाबत काही वेगळा आदेश काढण्यास त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.