Lockdown 4.0 : 31 मे पर्यंत मॉल-मल्टीप्लेक्ससह ‘ही’ सर्व ठिकाणं बंदच, ‘या’ अटीवर क्रीडा संकुलं उघडणार : गृह मंत्रालय

वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशातील देखील कोरोनाबाधितांचा आकडा 90 हजाराच्या वर गेला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं केंद्र सरकारनं प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहे. लॉकडाऊन 3.0 चा आजचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, गृह मंत्रालयानं एक आदेश काढला असून त्यानुसार देशात कुठेच सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमींग पुल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि यासारखी ठिकाणं 31 मे पर्यंत बंदच राहणार आहेत.

दरम्यान, यापुर्वी पंजाब, तेलंगणा, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांनी 31 मे पर्यंत राज्यात संपुर्णपणे लॉकडाऊन जाहीर केला आहे. आपत्ती व्यवस्थापनानं पत्र लिहून केंद्र आणि राज्य सरकारांना लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यास सांगितलेले आहे.

ही ठिकाणं राहणार बंद – सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमींग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि अ‍ॅडिटोरियम, असेंम्बली हॉल आणि यासारखी ठिकाणं 31 मे पर्यंत बंद राहणार.

रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन – या तिन्ही झोनमधील नियमावलीसाठी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशाचं पालन करावं.

क्रीडा संकुल आणि स्टॅडिया – क्रीडा संकुल आणि स्टॅडिया उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे मात्र तिथं प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही.

आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक – कामाच्या ठिकाणी कार्यालयातील सुरक्षिततेसाठी सर्वांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर नियमपणे हेल्थ स्टेटस अपडेट करावं असे देखील गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. तसेच जिल्हा प्रशासनानं देखील यावर लक्ष ठेवावं असे देखील सांगण्यात आलं आहे.