Coronavirus : पुण्यातील लॉकडाऊन फेल ? Lockdown काळामध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. पुण्यात 14 जूनपासून लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. मात्र याच काळात पुण्यातील आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंतचे मृत्यूही या कालावधीत नोंदवले गेलेत. त्यामुळे पुण्यातील लॉकडाऊन फेल गेल्याचा आरोप होऊ लागला आहे. 23 तारखेच्या पुढे जर लॉकडाऊन वाढवण्यात आला तर आपण आंदोलन करु, असा इशारा व्यापाऱ्यांनी यापूर्वीच दिला आहे.

14 जून ते 21 जुलै या कालावधीत पुणे जिल्ह्यात 16561 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर 344 जणांचा मृत्यू झाला. 6 जून ते 13 या आधीच्या सात दिवसांच्या कालावधीत पुण्यात 11236 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर त्याचवेळी 228 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. म्हणजे लॉकडाऊनच्या या कालावधीत पुण्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यूची संख्या नोंदवली गेली आहे.
या आकडेवारीवरून पुण्यातील लॉकडाऊन यशस्वी झाला कि अयशस्वी हे सांगण्यास पुरेसे आहे. व्यापारी संघटनेने तर या लॉकडाऊनलाच सुरुवातीपासूनच विरोध केला होता आणि आता 23 तारखेनंतर पुढे जर लॉकडाऊन वाढवला तर त्या विरोधात आपण आंदोलन करु, असा इशारा पुण्यातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

समूह साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय आहे ?

कोरोना संकटाच्या काळात कोरोनाची समूह संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु मागील सात दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची वाढललेली संख्या पाहता ही साखळी तोडण्यात यश आलेलं दिसत नाही. मुळात समूह साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय आहे का ? याबद्दलच अनेक तज्ज्ञांच्या मनात शंका आहे. लॉकडाऊन काळात सरकारी रुग्णालयतील व्हेंटिलेटर्स फुल्ल झाल्याचे पहायला मिळत आहे. ससून, नायडू किंवा कोणत्याही शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटिलेटर्स मिळत नाहीत आणि खाजगी रुग्णालय उभं देखील करत नाहीत, अशी अवस्था सध्या पुणेकरांची झाली आहे.

सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न, लॉकडाऊन करून काय साध्य केलं

अशा परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अगतिकतेतूनच मंगळवारी संध्याकाळी काही तरुणांनी त्याच्या मित्राला रुग्णवाहिकेतून अलका चौकात आणले आणि त्याठिकाणी आंदोलन सुरु केलं. लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या शेखर गायकवाड यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी केली. मात्र, नवीन आयुक्त प्रवीण कुमार यांना देखील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात गेल्या 8-10 दिवसांत यश आल्याचे पहायला मिळत नाही. त्यामुळे गेल्या दहा दिवसांमध्ये पुणे आणि लगतचे शहर असलेल्या पिंपरी चिंचवड शहरासह आजूबाजूची गावं बंदिस्त करून काय साधलं असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.