Lockdown व वर्क फ्रॉम होममुळे गुडघेदुखीच्या समस्येत वाढ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या काळात कित्येक महिने नागरिकांना घरी बसावे लागले. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने घराबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने अनेक नागरिकांना आता नवनवीन व्याधींना सामोरे जावे लागत आहे. लाॅकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे अनेक वयोगटांतील व्यक्तींमध्ये गुडघेदुखीच्या तक्रारीत वाढ झाल्याचे दिसून येते आहे. त्याचबरोबर अस्थिरोग, सांधेरोपण तज्ज्ञांकडे गुडघेदुखीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

कोरोनाकाळात मंदावलेली हालचाल, एकाच ठिकाणी बसण्याच्या सवयीमुळे आखडलेले सांधे आदींमुळे सहा महिन्यांनंतर गुडघेदुखीचा त्रास वाढल्याचे दिसून आले आहे. लोक घराबाहेर पडू लागल्याने शारीरिक हालचालींना आलेला वेग, तसेच चुकीच्या पद्धतीने केले जाणारे व्यायाम यामुळे गुडघ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या थंडी वाढल्यानेही गुडघेदुखीचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण अस्थिरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

अस्थिविकार तज्ज्ञ डॉ. अलोक दामले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या होत्या. व्यायामाच्या अभावामुळे अनेकांचे वजन वाढले आहे. ४० ते ६० या वयोगटांतील सुमारे ७० टक्के नागरिकांना गुडघेदुखीची समस्या भेडसावत आहे. अनेकदा चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने गुडघ्यावर अतिरिक्त भार येत असल्याने वेदना होतात. अनलॉकनंतर दहापैकी आठ रुग्णांमध्ये गुडघेदुखीची समस्या दिसून येत आहे. निरोगी आहार आणि व्यायामामुळे आपली हाडे, स्नायू आणि सांधे मजबूत राहतात. हाडांना दररोज किमान २० मिनिटे सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे.

निरोगी राहायला हवे
आपली हाडे, स्नायू आणि सांधे मजबूत राहण्यासाठी निरोगी आहार आणि व्यायाम गरजेचा आहे. हाडांना दररोज किमान २० मिनिटे सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. औषधे घेतल्यानंतरही गुडघेदुखी कायम राहत असेल, तर नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

गुडघेदुखी टाळण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात
– आवश्यकतेनुसार वेदनाशामक औषधे घेणे.
– दररोज व्यायाम करणे, चालणे, दीर्घकाळ उभे राहणे किंवा बसणे टाळावे
– फिजिओथेरपिस्ट किंवा योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली व्यायाम करा.
– वजन नियंत्रणात ठेवणे.
– अति ट्रेकिंग, चढ-उतार करणे टाळावे.
– संतुलित आहार घ्यावा.
– हिरव्या पालेभाज्या, दूध, फळे, बीट, सोयाबीन, माशांचा आहारात समावेश करावा.