मंत्री जयंत पाटलांचा इशारा, म्हणाले – ‘नियमांचे उल्लंघन करून कोणी रस्त्यावर आला तर त्याला किंमत मोजावी लागेल’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. आता जनतेनेही निर्बंध पाळले पाहिजेत. पोलिसी खाक्या दाखवून कोणालाही बंधनात ठेवायचे नाही, मात्र नियम न पाळता कोणी रस्त्यावर आला तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दिला आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले, देशात कोरोनाची लाट वेगाने वाढत आहे. संसर्ग टाळण्यासाठी देशभरात कोणत्याही निवडणूका घेणे उचित नव्हते. ज्या ठिकाणी निवडणूक झाल्या आहेत, त्या ठिकाणी कोरोनाचे गंभीर दुष्परिणाम दिसत आहेत. त्यामुळे निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोगाने तारतम्य बाळगणे आवश्यक होते अशी टीका पाटील यांनी केली आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. पोलिसांनी याआधी दोघाना अटक केली आहे याप्रकरणात आणखी कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर ही कारवाई करण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले.