#Loksabha2019 : गडकरी, चव्हाण, शिंदे, आंबेडकरांसह नेते भव्य मिरवणुकाद्वारे अर्ज भरणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी भरण्याचा आज शेवटचा दिवस असून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मतदान असणाऱ्या मतदारसंघातून दिग्गज नेते आज मिरवणुका काढून उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम मतदारसंघातील उमेदवार आज अर्ज भरणार आहेत.

नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच नाना पटोले आज उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आज अर्ज दाखल करणार आहेत. सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपाकडून जयसिद्धेश्वर महास्वामी तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. तीनही प्रमुख उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याने सोलापूमध्ये खऱ्या अर्थाने आजपासूनच रणधुमाळीला रंग चढू लागणार आहे.

बीडमधून प्रितम मुंडे आज अर्ज दाखल करीत आहेत. युतीचे उमेदवार हंसराज अहिर, आनंदराव अडसूळ, भावना गवळी आणि संजय धोत्रे हेही आज अर्ज भरणार आहेत.