अमिताभ बच्चनचे सिनेमेही ‘फ्लॉप’ होतात, पराभवाने खचू नका ; सुप्रिया सुळेंचा पार्थ पवारांसह पराभूत उमेदवारांना ‘सल्ला’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. तर राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सुरुवातीस राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला होता. मात्र त्या अखेर माध्यमांशी बोलल्या आहेत. तसंच राज्यातील पराभवाबद्दल बोलत मोजक्या शब्दात कार्यकर्त्यांना न खचण्याचा सल्ला दिला आहे. एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही. अमिताभ बच्चन यांचेही सिनेमे फ्लॉप होतात त्यामुळे खचून जावू नका, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला.

पार्थ सहित सगळ्याच पराभूत उमेदवारांना सल्ला आहे की त्यांनी खचून जाऊ नये. आता आणखी जोरात काम करण्यासाठी तयारी केली पाहिजे. बारामतीत मिळालेला विजय हा कार्यकर्त्यांचा आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केले. नरेंद्र मोदींना मिळालेला विजय हा लोकांचा निर्णय आहे. तो आपण मान्य केला पाहिजे. आता त्यांनी उत्तम काम करावं, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

खडकवासल्यातून सुप्रिया सुळेंच्या विरोधात अधिक मतदान झाले. त्यावरूनही त्यांनी आपले मत मांडले. मला खडकवासल्यातून इतकं विरोधी मतदान का झालं याचा आढावा घेऊ. तसंच आम्ही पुन्हा लोकांमध्ये जाऊन त्यांचा विश्वास संपादन करू, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. तर निकालाने अनेकांना धक्केही मिळाले आहेत. ते सर्व बाजूला सारून ही राजकिय मंडळी आता दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. राज्य मंत्रिमंडळाने देखील यासंदर्भात मंत्री आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली आहे. पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांना वेळ दिलेली नाही.