शिर्डीतून सेनेचे सदाशिव लोखंडे ‘एवढ्या’ मतांनी विजयी

काँग्रेसच्या आ. कांबळे यांचा पराभव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसच्या आ. भाऊसाहेब कांबळे यांचा 1 लाख 20 हजार मतांनी पराभव केला आहे. या मतदारसंघातून वंचित बहुजन व अपक्ष उमेदवार माजी खा. वाकचैरे यांनी बरीच मते घेतली.

खा. लोखंडे यांना 4 लाख 86 हजार 820 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार आ. कांबळे यांना 3 लाख 66 हजार 625 मते मिळाली आहेत. खा. लोखंडे यांनी 1 लाख 20 हजार मतांची आघाडी घेतसविजय मिळविला. याच मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे रिंगणात होते. त्यांना 35,526 मते मिळाली. वंचित बहुजनचे संजय सुखदान यांना 63,287 मते मिळाली.

महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे यंत्रणा होती. तर कांबळे यांच्या बाजूने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात होते. लोखंडे यांच्या आघाडीमुळे थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी महिन्याभरातच पदाचा राजीनामा देऊन महायुतीच्या उमेदवारांना साथ दिली होती. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात काँग्रेस चांगलीच एकाकी पडली होती.