लोकसभा : ‘कसब्या’त मतांची आघाडी की ‘बिघाडी’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (विश्लेषण)- लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला घवघवीत यश मिळते ,कोणाला पराभवाचा सामना करावा लागतो, कोणती नवी समीकरणे उदयास येतात हे उद्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार असले तरी या निकालावरच आगामी विधानसभा निवडणुकीची समीकरणे ठरणार आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातील कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला आहे मात्र येथून गतवेळपेक्षा मताधिक्य किती जास्त मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पुणे लोकसभा मतदार संघातील भाजप व महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांचा हा गेल्या अनेक वर्षापासूनचा हक्काचा बालेकिल्ला मात्र यंदा या बालेकिल्ल्यातून बापट यांना कितीचे ‘ लीड ‘ मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गतवेळी अनिल शिरोळे यांना कसबा मतदारसंघातून ५७ हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती. भाजपचे परंपरागत हक्काचे मतदार आणि अन्य मतदान त्यावेळी वळविण्यात यश मिळाल्याचे आकडेवारीतून पाहावयास मिळाले होते. त्यामुळे यंदा गिरीश बापट जे अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत . त्यांना हक्काचे मतदार सोडून अन्य मतदान मिळविण्यात यश मिळते का ? हा भाग पुण्याचा राजकारणात चर्चेचा ठरला आहे.

भाजपचा परंपरागत असलेल्या या मतदारसंघाचे चित्र २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर बदलले . भाजपला सोईचे नसलेले काही भाग या मतदारसंघाला जोडले गेल्याने आणि मनसेच्या रूपाने त्यावेळी नवे आव्हान या मतदारसंघात भाजपसमोर उभे राहिले होते.परिणामी गेली विधानसभा निवडणूक भाजपचे गिरीश बापट यांच्यासाठी आव्हान ठरली होती. मनसेचे त्यावेळचे उमेदवार रविंद्र धंगेकर , काँग्रेसचे रोहित टिळक यांनी चुरशीची लढत दिली मात्र राजकारणात कसलेल्या बापट यांचा विजय झाला ;पण त्यांचे मताधिक्य चांगलेच कमी झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदा लोकसभा निवडणुकीत बापट यांना या हक्काच्या मतदारसंघातून मतांची आघाडी मिळते कि ‘गणित ‘ बिघडते याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. त्यात मतभेद मिटले जातात मात्र मनभेद कायम राहतात हा मुद्दा या मतदारसंघात महत्वाचा ठरला आहे.भाजपमधील नाराज गटांनी कोणाला साथ दिली हे निकालानंतर स्पष्ट होणार असले तरी, भाजप पक्षांतर्गत विरोधक आणि काँग्रेस – राष्ट्रवादीला मानणारा मतदार यामुळे बापट यांचे मताधिक्य घटणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघात भाजपला मानणारा हक्काचा मतदार पाहता काँग्रेस -राष्ट्रवादी आणि मनसेला मानणारा वर्गही आता मोठा आहे.

आता उत्तराधिकारी कोण ?
पालकमंत्री गिरीश बापट हे खासदार होणार हे अटळ आहे, यानुसार भाजपमधील इच्छुकांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून ‘ लॉटरी ‘ कशी लागेल यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. वास्तविक गेली अनेक टर्म गिरीश बापट हे या मतदारसंघातून आमदार राहिल्याने पक्षातील अनेकांचे आमदारकीचे स्वप्न केवळ प्रतिक्षेपुरते होते. मात्र बापट हे लोकसभा निवडणूक लढवून खासदार होणार असल्याने इच्छुकांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी कुणाला संधी द्यायची हे मात्र बापट हेच ठरविणार आहेत . त्यामुळे कसब्यातून गिरीश बापट यांचा उत्तराधिकारी कोण ? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार असले तरी गिरीश बापट यांचा कौल कुणाला ? यावर इच्छुकांच्या आमदारकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

सद्यस्थितीत महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने तसेच धीरज घाटे ही नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. त्यात गिरीश बापट यांच्या समर्थकांकडून बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांचे नावही आतापासून लावून धरण्यात येत आहे.त्यामुळे आगामी काळात मोठा पेच निर्माण होणार आहे. त्यात मध्यंतरी स्वतः बापट यांनी विधानसभेला सर्वांना पटेल असा चेहरा दिला जाईल असे जाहीर केले होते त्यामुळे आता कुणाला आमदारकीची संधी मिळते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.