Pune News : आणखी 2 पोलिस ठाणे शहर आयुक्तालयाला जोडली जाणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील वाघोली, ऊरळीकांचन, बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे रावेत आणि शिरगाव या नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकित घेण्यात आला. त्यामुळे आता पुण्यात सहा नवीन पोलीस ठाणे अस्तित्वात येणार आहेत. लोणीकंद आणि लोणी काळभोर ही पोलीस ठाणे शहर आयुक्तालयात समावेश करण्यात येणार असून शहर पोलीस ठाण्यांची संख्या 35 होणार आहे.

पुणे ग्रामीणमधील लोणीकंद पोलीस ठाण्याचे विभाजन करुन वाघोली, लोणी काळभोरचे विभाजन करुन ऊरळी कांचन, हेवेलीचे विभाजन करुन नांदेड सिटी, तर शहर आयुक्तालयातील हडपसरचे विभाजन करुन काळेपडळ, चंदननगरचे विभाजन करुन खराडी पोलीस ठाणे तर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे विभाजन करुन बाणेर पोलीस ठाणे अस्तित्वात येणार आहे.

यामधील लोणी काळभोर आणि लोणीकंद ही पोलीस ठाणी पुणे ग्रामीणमध्येच ठेवण्यात येणार होती. मात्र, सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लोणीकंद आणि लोणी काळभोर ही पोलीस ठाणी शहर आयुक्तालयात जोण्याचा निर्णय घेण्यात आला. वाघोली महापालिकेतील समावेश, पुणे नगर महामार्ग आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक समस्या, गुन्हेगारीचे प्रमाण पाहता अधिक सुविधा मिळवण्यासाठी शहर आयुक्तालयात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाहन खरेदीसाठी निधी देण्यात येणार
कायदा – सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शिरुरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पुणे जिल्हानियोजन मंडळाच्या निधीतून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाला आणि जिल्हा ग्रामीण पोलीसांना वाहन खरेदीसाठी प्रत्येकी एक कोटी तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, गृह विभागाचे अपरमुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अपरमुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते.